Home > News Update > 80 टक्के मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी, तिसऱ्या लाटेचा धोका कमी? काय आहे TIFR चा अहवाल?

80 टक्के मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी, तिसऱ्या लाटेचा धोका कमी? काय आहे TIFR चा अहवाल?

80 टक्के मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी, तिसऱ्या लाटेचा धोका कमी? काय आहे TIFR चा अहवाल?
X

courtesy social media

मुंबई शहरात 1 जूनपर्यंत कोरोना व्हायरसमुळे संसर्ग झालेल्यांपैकी 80% लोक बरे झाले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील लोकांना कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका असण्याची शक्यता फारचं कमी असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. मूलभूत संशोधन करणाऱ्या देशातील नामांकित संशोधन संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) च्या शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात ही शक्यता व्यक्त केली आहे. या संदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे.

कोरोना संक्रमणाची माहिती आणि आत्तापर्यंत झालेल्या सेरो सर्व्हेच्या अहवालाच्या आधारे टीआयएफआरने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात यावर्षी 1 जूनपर्यंत मुंबईतील 80% लोक, कोरोनापासून बरे झाले आहेत. यातील 90 % लोकं झोपडपट्ट्यांमधील असून 70 % लोक इमारतींमध्ये राहणारे आहेत.

टीआयएफआरच्या अभ्यास अहवालानुसार या बऱ्या झालेल्या लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे. त्यामुळं जरी तिसरी लाट आली तर ती दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक ठरणार नाही. अहवालानुसार, ज्या लोकांना पहिल्या लाटेमध्ये संसर्ग झाला होता. त्यांची अँटीबॉडीची पातळी कमी झाल्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता आहे. परंतु हे कार्यक्षमतेच्या आणि परिणामकारकतेसह व्हेरिएंटच्या बदललेल्या वेग आणि लसीवर अवलंबून असेल.

करोना लाट आणि मुंबईची स्थिती?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, मुंबईत एकाच दिवसात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या 4 एप्रिल रोजी 11,163 वर पोहोचली होती... तर दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ही संख्या 28,000 आणि 25,000 इतकी होती. दिल्ली आणि बंगळुरूच्या तुलनेत पाहिलं तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम मुंबईत कमी प्रमाणात दिसून आला आहे.

सुमारे 1 कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईमध्ये 1 फेब्रुवारीपर्यंत 65% लोकांना या विषाणूची लागण झाली होती, परंतु मुंबई इतकी लोकसंख्या असलेल्या बंगळुरूमध्ये सुमारे 45% आणि दिल्लीत सुमारे 2 दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत 55% लोकांना 1 फेब्रुवारी पर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली होती.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क फोर्स या विश्लेषणाशी सहमत नाही. सरकारी कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले, यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ही बाब मान्य केली नाही... त्यांच्या मते "जर आजही मुंबईत 600-700 प्रकरणांची नोंद होत असेल तर लोकसंख्येच्या 80% लोकांमध्ये अँटीबॉडीज अस्तित्त्वात असताना ही रुग्ण संख्या दिसली नसती. यावरून दोन निष्कर्ष काढले जाऊ शकतात. या अँटीबॉडी नेमक्या कशा मोजल्या गेल्या आहेत? neutralizing antibody मध्ये की Total antibody मध्ये? कारण सर्वात जास्त महत्त्व हे neutralizing antibody असतात. एकूण अँटीबॉडी नाही.

"दुसरा निष्कर्ष असा होऊ शकतो की, लोकसंख्येचा अभ्यास केला असेल. त्यामध्ये अँटीबॉडी आढळल्या असू शकतात. परंतू सामान्य लोकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी नसतील" बीएमसीच्या अनेक कोव्हिड केअर सेंटरमध्ये रूग्णांवर उपचार करत असलेल्या डॉ. वाघमारे यांचे म्हणणे आहे की, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा सर्वेक्षण अहवाल खूप सकारात्मक आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम आरोग्याच्या दृष्टीने सशक्त नसलेल्या लोकांवर होईल. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र, या लाटेचा परिणाम दुसऱ्या लाटेइतका गंभीर नसेल.

डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे म्हणाले, "टाटा रिसर्चच्या अहवालाशी मी सहमत आहे, इतर शहरांच्या तुलनेत पहिल्याच लाटेचा मुंबईवर सर्वाधिक परिणाम झाला. पहिल्या लाटेत 40+, 50+ वयातील कोमॉर्बड रुग्ण आढळले होते. पण दुसऱ्या लाटेत 30, 40 वयाचे असलेले लोक होते. तर तिसऱ्या लाटेत तरुण व मुलांचा जास्त सहभाग असू शकेल, पण मला वाटते की ही काळजी करणारी नसावी."

एकूणच अहवालाचा विचार केला तर अहवाल असं सांगतो की, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आहे. अशा व्यक्तींमध्ये दुसऱ्यांदा कोरोना होण्याचा दर कमी असेल. तसंच जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरण वेगवान असेल तर तिसरी लाट सप्टेंबरपर्यंत दिसणार नाही. परंतु हे विचार करणे देखील महत्त्वाचे आहे की, ज्य़ा दिल्लीमध्ये दररोज 28,000 कोरोना रुग्ण आढळत होते. आज त्याच दिल्लीत सध्या १०० पेक्षा कमी रुग्णसंख्या दिसत आहे. परंतु मुंबईत अजूनही 700-500 रुग्णांची नोंद होत आहे.

Updated : 1 July 2021 7:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top