आश्रमशाळेतील 37 मुलांना कोरोना, 16 कर्मचारीही पॉझिटिव्ह
X
पालघर : जव्हार तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. एका आश्रमशाळेतील 37 मुले तर त्याच शाळेतील 3 शिक्षक आणि आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सेंट्रल किचनचे 16 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळेले आहेत. काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाचे विनवळ आश्रमशाळेतील श्रीशक्ती संस्थेचे सेंट्रल किचन येथील 16 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांना किरकोळ लक्षणे असून यातील काहींना विक्रमगड येथील रिव्हेरा या कोविड केंद्रात हलविण्यात आले आहे.
तर तीन चार दिवसांपूर्वी हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या 9 विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला येत असल्याने त्यांना जामसरच् प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणण्यात आले. त्यांची तिथेच अँटिजेन तपासणी केली असता नऊचे नऊ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले. हे धक्कादायक वास्तव समोर आल्यावर तातडीने आश्रमशाळेतील विद्यार्थी व हिरडपाडा गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात शाळेतील 28 विद्यार्थ्य़ांसह 3 शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हिरडपाडा शाळेतील एकूण 37 विद्यार्थी व 3 कर्मचारी असे 40 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.