देशांतर्गत 26 व्या ई-लिलावादरम्यान 3.46 लाख टन गहू आणि 13,164 टन तांदूळ विक्री
X
नवी दिल्ली : तांदूळ, गहू तसेच आटा यांच्या किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याच्या भारत सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून, गहू आणि तांदळाचे साप्ताहिक ई-लिलाव आयोजित करण्यात येतात. दरम्यान दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी 26 व्या ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत 26 व्या ई-लिलावादरम्यान 3.46 लाख टन गहू आणि 13,164 टन तांदूळ विक्री झाली आहे.
त्यात 4 लाख टन गहू तसेच 1.93 लाख टन तांदूळ लिलावासाठी उतरवण्यात आले आहे. या ई-लिलावामध्ये 2178.24 रुपये क्विंटल दराने 3.46 लाख टन गहू आणि 2905.40 रुपये क्विंटल दराने 13,164 टन तांदळाची विक्री झाली. 20 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या या ई-लिलावापासून, बोली लावणाऱ्या ज्या व्यक्तींकडे एलटी वीज जोडणी आहे. अशांना केवळ 50 टन गहू विकत घेण्याची आणि ज्या बोली लावणाऱ्यांकडे एचटी वीज जोडणी आहे. अशांना 250 टन गहू विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी तसेच लिलावात यशस्वी ठरलेल्यांनी ओएमएसएस(डी) योजनेखाली विकत घेतलेला गहू योग्य प्रक्रियेसह खुल्या बाजारात उतरवला जात गेला आहे. याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
याशिवाय, 20 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या या ई-लिलावापासून बोली लावणाऱ्यांसाठी तांदळाचे किमान आणि कमाल प्रमाण 1 टन आणि 2 हजार टन इतके निश्चित करण्यात आले आहे. ओएमएसएस(डी) योजनेखाली तांदळाच्या लिलावासाठी बोली लावताना 1 टनच्या पटीत बोली लावावी लागेल. ओएमएसएस(डी) योजनेखाली होणाऱ्या तांदळाच्या विक्रीचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे आणि नुकत्याच झालेल्या ई-लिलावात 13 हजार164 टन तांदळाची विक्री झाली. यापूर्वीच्या ई-लिलावात केवळ 3 हजार 300 टन तांदूळ विकला गेला होता.