विटा येथे काळया बाजारात जाणारी धान्याची ३०० पोती जप्त
कोरोना लॉकडाऊनकाळात गरीबांसाठी वाटले जाणारे रेशन काळाबाजार करुन पोल्ट्रीधारकांना विकण्याचे रॅकेट वीटा (जि. सांगली)मधे उघडकीस आलं आहे.
X
लॉक डाऊन काळात गरिबांना रेशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. लोकांच्या भुकेचा प्रश्न सोडवण्यास या धान्याची मदत झाली. परंतू ग्रामीण भागात रेशनच्या दुकानातून लोकांना पावत्या न देणे, आपले नाव ऑनलाईन नाही आपल्याला धान्य मिळणार नाही, तुमच्या कार्डचे धान्य आलेले नाही. तुमचे कार्ड बंद झालेले आहे. अशी कारणे देऊन अनेक कार्डधारकांना रेशन नाकारले जाते. यातील काहींच्या बाबतीत तांत्रिक अडचण असतेच. पण यातून शिल्लक धान्याची रातोरात विक्री होत असल्याचे सत्य समोर आले आहे.
या योजनेत मोठा घोटाळा विटा शहरात उघड झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खानापूर तालुक्याचे नेते साजिद आगा आणि सचिव कृष्णत देशमुख या दोघांनी गेले काही दिवस गनिमी काव्याने या धान्याच्या घोटाळ्यावर लक्ष ठेवले. रेशनच्या धान्याची पोती एका पोल्ट्री तील गोडाऊन मध्ये साठवून ठेवली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर तात्काळ त्यांनी तहसीलदार विटा येथे संपर्क साधला. तहसीलदार विटा यांनी त्यांची एक टीम सोबत पोलीस विभागाला पाचारण केले. आणि त्या गोडाऊन मधून सुमारे २२१ पोती तांदूळ व ४८ पोती गहू जप्त करण्यात आला. मनसेने दिलेल्या माहितीनुसार हे गोडाऊन तुकाराम गायकवाड यांचे असून त्यांनी ते रामभाऊ सपकाळ यांना दिले असल्याचे समजते.
मनसे ने हा घोटाळा उघडकीस आणला. इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य काळया बाजारात जात असताना अधिकाऱ्यांना हे समजत कसे नाही. या घोटाळ्यात अधिकारी देखील सहभागी असल्याचा आरोप साजिद आगा यांनी केला आहे. संबंधित व्यक्ती एका राजकीय गटाशी संबंधित असल्याची सूत्रांनी प्राथमिक माहिती दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार का नाही याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे.
याबाबत निवासी नायब तहसीलदार यांच्याकडून आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली असता सदर ठिकाणी २२१ पोती तांदूळ ४८ पोती गहू जप्त करून सील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत तहसीलदार ऋषिकेश शेळके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणतात, मनसे च्या तक्रारी नुसार छापा मारला असता त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ यांची अनुक्रमे २२१ व ४८ पोती सापडली याबाबत त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत यामुळे हा साठा अवैध असून काळया बाजाराने विक्रीस आणल्याचे दिसून आले. सदर गोडाऊन सिल केले असून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.