जेलमध्ये दलित तरूणाचा मृत्यू, तीन पोलिसांवर गुन्हा दाखल...
X
उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यामधील कुडवार पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्यामध्ये एका दलित तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याच्या आरोपात या युवकाला कारागृहात टाकण्यात आलं होतं. दलित युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने तीन पोलिसांवर खुनाचा आरोप केला आहे. या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून तीनही पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
या प्रकरणात पोलिस स्टेशनमधील पोलिस अरविंद पांडे, पोलीस निरीक्षक संजय यादव आणि हवालदार ब्रजेश सिंह यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही पोलिसांना गेल्या २ जून पासून निलंबित करण्यात आलं आहे. तरीही या प्रकरणात आत्तापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सर्कल ऑफिसर (नगर) राघवेंद्र चतुर्वेदी यांनी शनिवारी सांगितले की - आरोपी पोलिसांवर कुडवार पोलीस स्टेशनमध्ये ३ जूनला आयपीसी कलम ३०२ (खून), ३०७ (खुनाचा प्रयत्न), ५०६ (धमकी), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे) आणि ३०२ (स्व-ईच्छेने दुखापत पोहोचवणे) यासारख्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलमांचाही समावेश करण्यात आला आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडवार पोलिस स्टेशन परिसरातील जगदीशपूर खेड्यातील राजेश कोरी याच्यावर (वय 25 वर्षे) अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 31 मे रोजी एका अल्पवयीन मुलीसह तो पळून गेल्याचं आरोपात म्हटंल आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने राजेश विरोधात ३१ मे च्या रात्री तक्रार नोंदवली होती. माझ्या मुलीला भूरळ घालून पळवून नेल्याचा आरोप त्यांनी राजेशवर केला होता. मात्र, तक्रार दाखल केली नव्हती.
त्यांनतर १ जूनला कुडवार पोलिसांनी राजेशची आई आशा आणि त्याची पत्नी ज्योती यांना ताब्यात घेतले. राजेशला हे कळताच तो 2 जूनच्या दुपारी अल्पवयीन मुलीसह स्वत: कुडवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला.
पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशीच म्हणजे २ जूनला राजेशचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. त्यानंतर ३ जूनला जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी शवगृहातून राजेशच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्याच्या शरीरावर जखमांचे निशाण आढळले.
दरम्यान शनिवारी उपजिल्हाधिकारी व मंडल अधिकाऱ्यांच्या उपस्थित मोठ्या पोलिस फौज फाटा बोलावून राजेश कोरी यांच्या मूळ गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, याप्रकरणी होमगार्ड भोलेंद्र यांच्या विरूद्ध सुद्धा कारवाई सुरू आहे.
राजेशची आई आशा देवी यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, "पोलीस अरविंद पांडे, पोलीस निरीक्षक संजय यादव आणि हवालदार ब्रजेश सिंह यांनी माझ्या मुलाचा खून करण्याच्या उद्देशाने गळा आवळून त्याला काठीने मारहाण केली. मी त्यांना विनंती केली की, जर माझा मुलगा दोषी आहे तर त्याला तुरूंगात पाठवा, पण त्याला मारहाण करू नका, परंतु त्यांनी माझे ऐकले नाही आणि मला व माझ्या लहान मुलाला घरी पाठवून दिले.
त्या म्हणाल्या, 'दुसऱ्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास मला राजेशची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात आले आणि आम्हाला जिल्हा रुग्णालयात यायला सांगितलं. माझा लहान मुलगा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याला राजेशचा मृतदेह मिळाला. मला खात्री आहे की, या पोलिसांनीच माझ्या मुलाला मारलं आहे.
राजेश पोलिस स्टेशनमध्ये हजर होण्यापुर्वी पोलिसांनी घरी येऊन गैरवर्तन करून जातीयवाचक शब्दाचा वापर केल्याचा आरोप राजेशच्या आईने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कोरी आणि अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी 3 जूनला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं, त्यानंतर मुलीला घरी पाठवून राजेशला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं.
मंडळ अधिकारी राघवेंद्र चतुर्वेदी यांनी सांगितल्यानुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फाशी दिल्याने राजेशचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात The Wire ने वृत्त दिलं आहे.