मुंबईत Omicronचे मुंबईत आणखी ३ रुग्ण
X
मुंबई – मुंबईत Omicron विषाणूचे आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून जनुकीय नमुन्यांमध्ये निदान झालेले ओमायक्रॉन विषाणू बाधित तीन रुग्णांचे अहवाल आले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
यामध्ये एक ४८ वर्षीय पुरुष टांझानिया येथून दि. ०४ डिसेंबर २०२१ रोजी आला होता. दि. ०४ डिसेंबर २०२१ रोजी त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सदर व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले होते. सदर रुग्णाचे कोविड लसीकरण झालेले नाही. या रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सदर रुग्णाच्या संपर्कातील दोघांची चाचणी करण्यात आली असून कोणीही कोविड बाधित नसल्याचे सांगण्यात आले आहे.
तर दुसरा रुग्ण एक २५ वर्षीय पुरुष असून तो लंडन येथून दि. ०१ डिसेंबर २०२१ रोजी भारतात आला. त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या रुग्णाचे कोविड लसीचे दोन्हीही डोस पूर्ण झाले आहेत. या रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे, पण त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही
तिसरी व्यक्ती एक ३७ वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) दक्षिण आफ्रिका येथून दि.०४ डिसेंबर २०२१ रोजी आला होता. या रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.
वरील तपशिलानुसार तिन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्याही कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी कोणीलाही कोविड बाधा झालेली नाही. या तीन रुग्णांमुळे कोविड विषाणूच्या ओमायक्रान बाधित रुग्णांची एकूण संख्या आता पाच झाली आहे.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.