269 एसटी कर्मचाऱ्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची मागणी
X
नाशिक : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. राज्य सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसेल, तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विभागातील 269 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मागील 64 दिवसांपासून राज्यातील विविध आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचारी माघार घ्यायला तयार नाहीत. त्यातच सरकार या कर्मचाऱ्यांना नोटीसवर नोटीस बजावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही संताप लाट पाहायला मिळत आहे. राज्य सरकार एकीकडे कारवाईची धमकी देत आहे तर दुसरीकडे मागण्या मान्य करत नाही म्हणून हतबल होत नाशिक जिल्ह्यातील 269 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची मागणी केली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना या कर्मचाऱ्यांनी दिले आहे.
दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 36 कर्मचाऱ्यांना तुम्हाला बडतर्फ करण्यात का येऊ नये, अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. या कारवाईविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.