भारताची चिंता वाढली, नवीन कोरोनाचे २० रुग्ण आढळले
कोरोनाच्या नवीन विषाणूने भारताची चिंता वाढवली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
X
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळल्यानंतर ब्रिटनमधून गेल्या काही दिवसात आलेल्या प्रवाशांच्या तपासणीमध्ये २० जणांना नवीन कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. पण नेमके हे रुग्ण कुठले आहेत याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. यामध्ये या आधी सापडलेल्या ६ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी ३ रुग्णांच्या स्वॅबची तपासणी बंगळुरूमधील लॅबमध्ये, दोघांची हैदराबादच्या लॅबमघ्ये आणि एका रुग्णाच्या स्वबची तपासणी पुण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान भारत सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवरील बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. याआधी ही बंदी ३१ डिसेंबरपर्यंत होती. दरम्यान सध्या कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे २० हजार ५४९ रुग्ण आढळले आहेत. तर २६ हजार ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९८ लाख ३४ हजार १४१ झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान गेल्या चोवीस तासात महाराष्ट्राचत ५ हजारांच्या वर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.