ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी होणार २ हजार २२२ पदांची भरती
X
राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.
या आरोग्य संस्थांसाठी ८१२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ११८४ कुशल मनुष्यबळ सेवा, २२६ अकुशल मनुष्यबळ सेवा असे एकूण २२२२ पदे उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत होईल असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच काम पूर्ण झालेल्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. रुग्णसेवा पुरविण्यासाठी या रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्यास मान्यता मिळाली असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.
पालघर येथे नवीन जिल्हा रुग्णालयासाठी ३५५ पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहेत. सातारा, औंरंगाबाद, बुलढाणा, नागपूर, अहमदनगर, जालना, नंदुरबार, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद, पालघर, चंद्रपूर आणि पुणे या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात ४७ नवीन उपकेंद्र तयार करण्यात आले आहेत.
३७ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आली असून त्यासाठी १८५ नियमित पदे तर ३७० इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहा नवीन ग्रामीण रुग्णालयांसाठी ६० नियमित आणि ९६ इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येणार आहे. सोलापूर, बुलढाणा, सातारा, नाशिक, पुणे, नांदेड येथे हे नवीन ग्रामीण रुग्णालये करण्यात आली आहेत. लोहा (नांदेड), शिराळा (सांगली), श्रीरामपूर (अहमदनगर), कोरेगाव (सातारा), तिवसा (अमरावती) या पाच ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात आले असून त्यासाठी १०० पदांकरीता मान्यता देण्यात आली आहे.
यासोबतच रत्नागिरी, वर्धा, जळगाव आणि यवतमाळ येथील चार नवीन स्त्री रुग्णालयांसाठी १६८ नियमित पदे आणि २२० इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येतील. ग्रामीण भागातील कुटीर रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांच्या खाटांचे श्रेणीवर्धन देखील करण्यात आले असून त्यासाठी वाढीव पदांसाठी मान्यताही देण्यात आली आहे.
आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणावर भर देतानाच नव्या आरोग्यसंस्थांची निर्मिती झाल्याने राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ही पदे तातडीने भरली जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.