किल्ले रायगडावर शिव समाधीसमोर राख सदृश पावडर टाकण्याचा प्रयत्न?
X
रायगड : किल्ले रायगडावर शिव समाधीसमोर राख सदृश पावडर आणि पुस्तक पूजन करण्यावरून वाद झाला आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात मराठा सेवक समितीने तक्रार नोंदवली आहे. काही लोक पुस्तक पूजनाच्या नावाखाली बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचं किल्ले रायगडावर विसर्जन करीत असल्याचा त्याचप्रमाणे ही राख चंदन आणि अत्तरामध्ये भिजवून शिव समाधीला लावत असल्याचा आरोप पूजा झोळे या कार्यकर्तीने केला आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार किल्ले रायगडावरील शिव समाधीसमोर घडल्याचे सांगितले जात आहे. मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघड केला आहे.
बुधवारी दुपारी पुण्याच्या दोन व्यक्ती राख सदृश पावडर आणि पुस्तकाचे पुजन करीत असताना रायगडावरील काही जणांनी पाहिले. त्यावर अक्षेप घेत शिवप्रेमींनी महाड तालुका पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदर पुस्तक आणि राख सदृश पावडर ताब्यात घेतली असुन सदर पावडर केमिकल ॲनालिसिससाठी पाठवली आहे. या प्रकरणाची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. आता या तपासणीचा अहवाला आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहितीही महाड तालुका पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली.