Home > News Update > रायगड जिल्ह्यात २ जणांना डेल्टा प्लसची लागण, एकाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात २ जणांना डेल्टा प्लसची लागण, एकाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात २ जणांना डेल्टा प्लसची लागण, एकाचा मृत्यू
X

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसची दोन जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळे दिलेल्या अहवालानुसार दोन रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासन सक्षम असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

डेल्टा प्लस ची लागण व त्यातून बऱ्या झालेल्या तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे-

उरण तालुक्यातील श्रीमती करुणा उदय म्हात्रे, वय वर्षे 44 यांची दि.5 जुलै 2021 रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांना घसा खवखवणे, ताप व खोकला ही लक्षणे होती. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. त्यांचे कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लसीचे (पहिला डोस दि.25 फेब्रुवारी 2021 व दुसरा डोस दि.8 एप्रिल 2021 रोजी) दोन्हीही डोस पूर्ण झाले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही धोका नाही. श्रीमती करुणा उदय म्हात्रे यांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रोहा तालुक्यातील नागोठणे येथील ज्येष्ठ पत्रकार नवीन नारायण सोष्टे, वय वर्षे 69, त्यांना अशक्तपणा, ताप व खोकला ही लक्षणे होती. दि.05 जुलै 2021 रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांची दि. 15 जुलै 2021 रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांचे कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लसीचे (पहिला डोस दि.22 मार्च 2021 व दुसरा डोस दि.6 मे 2021 रोजी) दोन्हीही डोस पूर्ण झाले होते. मात्र सर्व प्रकारचे आवश्यक उपचार करुनही श्री.सोष्टे यांचे दि.22 जुलै 2021 रोजी निधन झाले. श्री.सोष्टे यांच्या संपर्कात आलेल्या 21 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव झाला आहे, पण नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरु नये, कोविड-19 संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करुन घ्यावे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Updated : 14 Aug 2021 7:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top