108 माजी नोकरशहांनी थोपटले मोदींविरोधात दंड, द्वेषाच्या राजकारणावरून लिहीले खुले पत्र
X
देशात अल्पसंख्यांक समुदायांवर होत असलेले हल्ले आणि द्वेषाच्या राजकारणावरून देशातील 108 माजी नोकरशहांनी पंतप्रधान मोदींना पत्राच्या माध्यमातून चांगलेच सुनावले आहे. (108 Bureaucrats letter to PM Modi)
देशात वाढत असलेल्या द्वेषाच्या राजकारणामुळे आणि भाजप शासीत राज्यांमध्ये अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभुमीवर देशातील 108 माजी नोकरशहांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे.
या पत्रात माजी नोकरशहांनी म्हटले आहे की, भाजप शासीत राज्यांमध्ये द्वेषाचे राजकारण वाढत आहे. तसेच अल्पसंख्यांक समुदायावर होत असलेल्या अत्याचारांमध्ये वाड झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्रात अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
तसेच माजी सनदी अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, मुस्लिमांविरोधातील हिंसाचारामध्ये (Violence ) वाढ होत आहे. त्यात आसाम, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधील हिंसाचारात वाढ झाली आहे. तसेच केंद्र सरकारच्या हाती पोलिस व्यवस्था असलेल्या दिल्लीतही अशाच प्रकारची स्थिती आहे. मात्र या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळले आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.
या पत्रात म्हटले आहे की, देशातील राजकीय परिस्थिती चिंताजनक अवस्थेवर पोहचली आहे. तर देशात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे माजी नोकरशहांनी लिहीलेल्या पत्रात पंतप्रधानांनी हे द्वेषाचे राजकारण बंद करायला हवे, अशी विनंती केली आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधानांनी निपःक्षपातीपणे राजकारण करायला हवे आणि द्वेषाचे राजकारण थांबवायला हवे, असे या पत्रात म्हटले आहे.
या घटनांमुळे घटनात्मक नैतिकताच नाही तर आचार आणि देशातील सामाजिक जडण घडणदेखील प्रभावीत होत आहे. त्यामुळे देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी काळजी घ्यायला हवी, असे मत या पत्रात व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनाही केले आवाहन
देशात धार्मिक द्वेषाच्या आणि अल्पसंख्यांक समुदायाविरोधात हिंसाचाराच्या घटना घडत असताना पंतप्रधान म्हणून तुमचे मौन धक्कादायक आहे. त्यामुळे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या घोषणेची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचे आवाहनही या पत्रात माजी नोकरशहांनी पंतप्रधानांना केले. तर तुम्ही पक्षपाती विचारांच्या वर उठून भाजप शासीत राज्यांमध्ये होत असलेले द्वेषाचे राजकारण देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमीत्ताने बंद करण्याचे आवाहन कराल, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
या पत्रावर 108 माजी नोकरशहांच्या सह्या
देशातील 108 माजी सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना खुले पत्र लिहीले आहे. त्यामध्ये दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग, देशाचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे प्रधान सचिव टी के एस नायर, माजी गृहसचिव जी के पिल्लई यांचा समावेश आहे. त्याबरोबरच ज्युलिओ रिबेरो, रवी बुद्धीराजा, व्ही पी राजा, मीरा बोरवणकर आणि अण्णा दाणी हे महाराष्ट्रातील काही माजी नोकरशहा आहेत ज्यांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे.