Home > News Update > भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; 10 जणांचा मृत्यू

भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; 10 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट वाढत असताना मुंबईतील भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली त्याचप्रमाणे अशा रीतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही दिले असून दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलगिरी व्यक्त करत मदतीचं आश्वासन दिलं आहे.

भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; 10 जणांचा मृत्यू
X

गतवर्षीच्या कोरोना संकटामुळे मॉलला तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली असून रुग्णालयाच्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याचं सागितलं आहे.

भांडूप दुर्घटनेच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "कोविडसाठी काही ठिकाणी तात्काळ आणि तात्पुरत्या पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयाची परवानगी दिली होती. त्यातलंच एक हे मॉलमध्ये तयार केलेलं रुग्णालय होतं. आपण राज्यभर जिथे शक्य असेल तिथे आवश्यकतेनुसार कोविड सेंटर आणि रुग्णालयांसाठी परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे हे रुग्णालय सुरु होतं. ही तात्पुरती परवानगी होती आणि ३१ तारखेला संपत होती".

"दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ठिकाणी आग लागली आणि पसरत वर गेली. तिथे जे कोरानो रुग्ण दाखल होते तेथील सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण काही जण व्हेटिलेटरवर होते त्यांना काढण्यास वेळ लागला. इतर रुग्णांची सुटका झाली पण त्यांची सुटका करण्यात वेळ लागला आणि त्यांचा मृत्यू झाला," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.


"अशा दुर्घटना झाल्यानंतर आपण सगळे जागे होतो आणि चौकशी सुरु होते. या बाबतीतही चौकशी केली जाईल. जर याच्यात कोणाचा दोष असेल तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल," असं उध्दव ठाकरेंनी दिलं.

"जिथे अशी हॉस्पिटल्स, कोविड सेंटर आहेत त्यांचं फायर ऑडिट करा आणि अशा दुर्घटना होऊ देऊ नका अशा सूचना केल्या आहेत," अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

"करोनाचं संकट वाढत अशून काही स्वयंसेवी संस्था, डॉक्टर यांची मदत घेणं आवश्यक होतं. रुग्णालयं आहेत अशा मॉल्सना आपण फायर ऑडिटच्या सूचना केल्या आहेत. याबद्दल पुन्हा एकदा पालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. जिथे जिथे हॉस्पिटल आहेत तिथे इतर संपूर्ण अस्थापनांसह संपूर्ण इमारतीचं फायर ऑडिट करणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे," अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

"एकूण ७८ लोक रुग्णालयात दाखल होते. यामधील १० जणांचा मृत्यू झाला असून इतर ६८ जण इतर रुग्णालयात दाखल झाले आहेत तर काहीजण घरी गेले आहेत. ती यादी आमच्याकडे आहे. गुरुवारी येथे ८४ लोक आले होते, ज्यामध्ये ५० पुरुष आणि ३४ महिला होत्या. पाच ते सहा जणांबद्दलची माहिती आम्ही अद्याप मिळवत आहोत," अशी माहिती पोलिसांनी दिली.



Updated : 26 March 2021 2:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top