#Budget2022 : प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी 100 खाटांचे रुग्णालय स्थापन करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नियमीत आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठी तरतूद केली आहे.
X
कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नियमीत आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठी तरतूद केली आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना 2022- 23 या वर्षात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी भरीव तरतूद करणार असल्याचे म्हटले.
अजित पवार यांनी म्हटले की, नियमीत अर्थसंकल्प वगळून तीन वर्षांसाठी 11 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. तसेच मुंबई शहराबाहेर प्रथम दर्जाचे शासकीय ट्रामा केअर युनिट नसल्याने तेथील रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे राज्यात नांदेड, भंडारा, अमरावती, सातारा, अहमदनगर आणि जालना या ठिकाणी प्रथम दर्जाचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यासाठी 100 कोटी तर आवर्ती खर्चासाठी 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
ग्रामिण भागातील गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयात शस्रक्रीयेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रीप्सी उपचार पध्दती उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. तर त्यासाठी 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही उपचार पध्दती सुरू करण्याचे प्रस्तावीत आहे. तर त्यासाठी 17 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक फेको उपचार पध्दती सुरू करण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे शासनाने ठरवले आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
राज्यातील 50 खाटांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या रुग्णालयांना धुलाईचे यंत्रे तर 30 खटांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयांना स्वच्छता संयंत्रे उपलब्ध करून देण्यात येईल. त्याबरोबरच कर्करोगाचे जलद निदान आणि उपचारासाठी 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक रुग्णालये आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी रायगड जिल्ह्यातील खानापुर तालुक्यात 10 हेक्टर जमीन देण्यात येत आहे. तसेच सर्व जिल्ह्यात नवजात शिशू आणि महिला रुग्णालयांची स्थापना करण्यात येणार आहे. 100 खाटांची सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालयांची स्थापना करण्यात येईल.
जालना जिल्ह्यात 100 खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याबरोबरच मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था येथे पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तर पुणे शहराजवळ एकाच छताखाली सर्व उपचार देण्याबाबत 100 एकर जागेवर अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसीटी उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.