अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 24 दिवसांनंतरही आरोपी मोकाट
राज्यात महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र पोलिसांमध्ये तक्रार देऊनही आरोपी 24 दिवसानंतरही मोकाट असल्याचे समोर आले आहे.
X
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कोगदे गावातील नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलीवर गावातीलच एका नराधमाने लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केला आहे. याबाबत 14 फेब्रुवारी रोजी जव्हार पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र 24 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार झाल्याच्या प्रकरणातील पीडिताच्या कुटूंबियांची परिस्थिती हालाकिची आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी हे कुटूंब स्थलांतरीत होते. तर मुलगी घर सांभाळून शिक्षण घेत होती. याचाच फायदा घेत आरोपीने प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयिन पीडितेवर बलात्कार केला. या घटनेची माहिती कुटूंबियांना समजल्यानंतर पीडितेच्या कुटूंबियांनी जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन 24 दिवसानंतरही या प्रकरणातील आरोपी मोकाट आहे. तर आरोपीकडून पीडितेच्या कुटूंबियांवर गुन्हा मागे घेण्यासाठी धमक्या देत, गावगुंडांमार्फत पीडितेच्या कुटूंबियांवर दगडफेक केल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले.
तसेच पीडितेवर अत्याचार होऊनही या प्रकरणातील आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही कुटूंबासहित आत्महत्या करू, असा इशारा पीडितेच्या कुटूंबियांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दिला.
या गुन्ह्यात हेतुपुरस्सर पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटूंबियांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे पालघर जिल्हा सचिव अनंतता वणगा यांनी जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लेंगरे यांच्या विरोधात गृह राज्य मंत्र्यांकडे तक्रार करून निलंबनासह कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणासंबंधी माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक लेंगरे यांच्याशी वारंवार संपर्क केला मात्र संपर्क झाला नाही.