मुसळधार पाऊस, बंधारा पाण्याखाली, रस्ते ही बंद, दोन महिन्याच्या चिमुकलीने रस्त्यातच तोडला दम
X
पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन , मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग असे देशाला जोडणारे प्रकल्प जात असताना दुसऱ्या बाजूला याच पालघर जिल्ह्यात प्राथमिक सोई सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने बंधारा पाण्याखाली गेला आणि पाड्यावरून दवाखान्यात जाणारी वाट बंद झाली. वेळेच उपचार न मिळाल्याने दोन महिन्यांच्या चिमुकलीला रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण गमावावा लागला. वाचा हृदय पिळवटून टाळणारा रवींद्र साळवे यांचा रिपोर्ट…
पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्गही बंद होतात. परिणामी जनजीवन विस्कळीत होते. दरम्यान, पालघरमध्ये विक्रमगडमधील एका २ महिन्याच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने बंधारा पाण्याखाली गेला आणि पाड्यावरून दवाखान्यात जाणारी वाटच बंद झाली. त्यामुळे चिमुकलीला वेळेच उपचार न मिळाल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विक्रमगड मधील मलवाडा म्हसेपाडा येथील लावण्या नितीन चव्हाण ही चिमुकली दोन दिवसांपूर्वी अचानक तापामुळे आजारी पडली . मात्र तिला श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात म्हसेपाड्याला गारगाई आणि पिंजाळ या दोन नद्यांच पाणी वेढा घालत असल्याने पाड्या बाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मलवाडा म्हसेपाड्याला जोडणारा नदी वरील जोडणारा लहान बंधारा पाण्याखाली गेला होता.
पन्नास पेक्षा अधिक कुटुंबांची वस्ती असलेल्या या पाड्याला चारही बाजूंनी नदीच्या पाण्याने वेढा घातला असल्याने या चिमुकलीला घेऊन कुटुंबीयांनी आड रस्त्याने प्रवास सुरू केला. हा आड रस्ता लांबून असल्याने रुग्णालयात पोहचण्याआधीच या बालिकेचा मृत्यू झाला . ही या मयत चिमुकलीच्या मृतदेहाचं विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून मृत्यूच कारण अजूनही समोर आलेला नाहीये.
चिमुकलीच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून आजही पालघरच्या ग्रामीण भागातील अनेक गाव पाडे हे रस्त्यांविना असल्याच धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झालंय . म्हसेपाड्याला जोडणारा नदीवर पूल तयार करावा अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून करत असून या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय . एका बाजूला पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन , मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग असे देशाला जोडणारे प्रकल्प जात असताना दुसऱ्या बाजूला याच पालघर जिल्ह्यात प्राथमिक सोई सुविधांचा बोजवारा उडालेला दिवसेंदिवस उघड होत आहे.