आणखी एक एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
राज्यात साडेपाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तर आतापर्यंत 100 पेक्षा अधिक एसटी कामगारांनी आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले आहे. त्यातच आज जळगाव जिल्ह्यातील यावल येथील एसटी कामगाराने सुसाईड नोट लिहून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
X
साडेपाच महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. तर त्रिस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार एसटीचे विलिनीकरण शक्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र दुसरीकडे विलिनीकरणासाठी कर्मचाऱ्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चपर्यंत कामावर हजर होण्याचे शेवटचे आवाहन केले आहे. पण त्यापाठोपाठ जळगाव येथील एसटी कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहून आपले जीवन संपवले आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथील एस.टी.संपात सहभागी असलेले यावल डेपोच्या ४८ वर्षीय शिवाजी पंडीत पाटील या एसटी चालकाने सुसाईड नोट लिहून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. तर त्याने मृत्यूपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
आत्महत्येपुर्वी एसटी चालकाने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, "माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे, माझ्या आत्महत्येचा माझ्या परिवाराशी काहीही संबंध नाही, धन्यवाद" असे लिहीले आहे. मात्र अजित पवार यांनी दिलेल्या अल्टिमेटममुळेच एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
शिवाजी पाटील हे गेल्या 8 वर्षापासून एसटी महामंडळात चालकाचे काम करत होते. तर गेल्या पाच महिन्यांपासून संप सुरु असल्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.