Home > Max Woman > दिमाग की बत्ती जलाओ... 'बाई, बूब्ज, ब्रा' नावाच्या फेसबुक पोस्टचा छुपा अजेंडा काय?

दिमाग की बत्ती जलाओ... 'बाई, बूब्ज, ब्रा' नावाच्या फेसबुक पोस्टचा छुपा अजेंडा काय?

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 'बाई, बूब्ज, ब्रा' नावाच्या फेसबुक पोस्टचा हेतू काय आहे? ही पोस्ट आत्ताच का आली, या विषयी माध्यमांवर चर्चा आत्ताच का? यांच्यामध्ये काही पॅटर्न आहे का? वाचा संजीव चांदोरकर यांनी सोशल मीडियावरील नेटिझन्सला दिलेला नवा विचार

दिमाग की बत्ती जलाओ... बाई, बूब्ज, ब्रा नावाच्या फेसबुक पोस्टचा छुपा अजेंडा काय?
X

बाकी वाढदिवस, लग्न, कुत्रे, मांजरी वगैरे पोस्ट डिस्कॉउंट करूया; पण सामाजिक, जेंडर, राजकीय, आर्थिक विषयावरच्या लोडेड पोस्ट वेगळ्या केल्या पाहिजेत; कारण त्यामागे पोस्टकर्त्याचा काही एक अजेंडा असतो. उघड किंवा छुपा, पण असतो.

"बाई, बूब्ज, ब्रा" नावाची पोस्ट टाकणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे नाव चर्चेत येते, तुम्ही कौतुक करा किंवा टीका करा, पण माझी चर्चा करा, जे तिला हवे असते. त्या पोस्टीवर तातडीने प्राईम टाईमवर कार्यक्रम घेणाऱ्या चॅनलला देखील तवा गरम असताना टीआरपी वाढवायचा असतो.

एव्हडेच नाही, गोमूत्र, शेणाने कोरोना बरा (ब्रा नव्हे !) होतो पासून गणपतीची प्लास्टिक सर्जरीच होती म्हणून आग्रह धरणाऱ्यांचा किंवा त्या पोस्टी फॉरवर्ड करणाऱ्यांना आपली कॉन्स्टिटयूनसी घट्ट करायची असते.

पोस्ट करणाऱ्यांना कशावरही पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य आहे. मान्य, ते मी नाकारत नाही; कोणीच नाही. पण प्रतिक्रिया देणाऱ्यांना प्रतिक्रिया देण्याचे वा न देण्याचे जे स्वातंत्र्य आहे ते, ते वापरतात का याचा त्यांनी स्वतःशी विचार केला पाहिजे.

सोशल मीडियावरील काही लोक उगाच प्रव्होक होऊन, ध्यानी मनी नसतांना समोर आलेल्या पोस्टीवर किस पाडत बसतात. अशास्त्रीय पोस्टी टाकणाऱ्या लोकांना शास्त्रीय म्हणजे काय ते शिकवत बसतात. त्यांना तुम्ही काय म्हणता यात काडीचाही इंटरेस्ट नाही; त्यांचा अजेंडा राजकीय आहे.

आपल्याला वाटते आपण शास्त्रीयतेच्या बिया लावतो; तर तो भ्रम आहे. बिया रुजायच्या तर जमिनीची मशागत करायला लागते. त्यांनी ती चाळीस वर्षे केली म्हणून त्यांच्या बिया पटापट रुजतात; आपण जमिनी तयार करायला कमी पडतोय.

या पोस्ट टाकणाऱ्यांना, कार्यक्रम घेणाऱ्यांना आजूबाजूला काय चालले आहे हे माहित नसते, इतर इश्यू माहित नसतात असे थोडेच आहे. त्या एवढ्या मोठ्या यादीतून ते हाच बरा विषय पोस्टसाठी निवडतात ? हि पोस्ट आताच का आली, हा कार्यक्रम आताच का घेतला जातोय, यांच्यामध्ये काही पॅटर्न आहे का ? त्या लोकांचे पोस्ट टाकण्याचे, कार्यक्रमाचे प्राधान्यक्रम काय ? पोस्टला प्रतिक्रिया देताना स्वतःशी प्रश्न तरी विचारूया !

प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला दिवसाला २४ तास, १४४० मिनिटे आणि ८६,४०० सेकंद मिळतात. त्याचे नक्की काय करायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते.

सोशल मीडियावरील मित्रानो, फक्त एकच सांगणे : "कोणत्याच पोस्टच्या मागे स्वतः फरफटत जाऊ नका" ; तुमचा सजग निर्णय घ्या आणि प्रतिक्रिया द्या.

सोशल मीडियावरचा आपला अजेंडा मनात पक्का करा मग कोणीच आपल्याला फरफटत नेऊ शकत नाही.

संजीव चांदोरकर (१५ जुलै २०२१)

Updated : 16 July 2021 3:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top