पत्रकार दिन : पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे
X
आज पत्रकारदिनानिम्मत महिला पत्रकार यांच्याबद्दल लिहित आहे. आज आपण प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल माध्यमांमध्ये महिला पत्रकारांचा वाढता सहभाग पाहतोय. मात्र आपल्याला माहित आहे का भारतातील पहिल्या महिला पत्रकार कोण होत्या… बऱ्याच लोकांना हे माहितच नाही, चला तर मग जाणून घेऊयात…
तानुबाई बिर्जे (1876-1913) या शतकभरापूर्वीच्या 'दीनबंधु' या सत्यशोधकी नियतकालिकाच्या स्त्री संपादक.
तानुबाई बिर्जे महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या. तानुबाईं बिर्जे यांचा जन्म १८७६ मध्ये पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुले यांच्या शाळेत झालं. तानुबाई यांचे वडिल देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि शेजारी होते. त्यामुळे सावित्रबाई आणि महात्मा फुले यांच्या सहवासात तानुबाईंचे जीवन गेल्यामुळे त्यांचा सत्यशोधक चळवळीचे विचार त्यांच्याकडे होते. २६ जानेवारी १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
१८९७मध्ये दीनबंधु या वृत्तपत्राची जबाबदारी वासुदेव बिर्जे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि १९०६ सालापर्यंत त्यांनी वृत्तपत्र चालवलं. मात्र काही काळानंतर त्यांचा प्लेगच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. पतीच्या जाण्यामुळे दीनबंधु वृत्तपत्र बंद पडतेय की काय असा प्रश्न पडू लागला होता, मात्र तानुबाई यांनी न डगमगता प्रबोधनाचे कार्य आणि दीनबंधु वृत्तपत्राची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दिनबंधु’ चालवायला घेतले. ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
तानुबाईंनी संपादक म्हणून त्यांनी आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करुन त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले. तानुबाईंची सामाजिक जाणीव, बहुजनांच्या उत्थानासाठी तळमळ आणि देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यामातून प्रबोधन करण्याचे ध्येय तानुबाई यांचे होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तानुबाईंची ही ओळख. एक अत्यंत यशस्वी, सक्षम संपादक म्हणून तानुबाईंचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुर्वण अक्षरांनी लिहिलं गेलं पाहिजे अशी मागणी होत आहे.
तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला पत्रकार ज्यांनी सत्यशोधक पद्धतीने पत्रकारिता करत समाजात विचारांची देवाण-घेवाण करत बदल घडवला. एकीकडे तानुबाई यांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात खूप साम्य आहे. महिला पत्रकारांची संख्या तर वाढलीये मात्र एकच विचार नक्की करा की आपण आज जी पत्रकारिता करतोय ती सत्यशोधक पद्धतीने करतोय का?