बाईचं शिक्षण ?
X
बसमध्ये, गर्दीत कोणी नकोसा स्पर्श केला, तर शिकलेली बाई मोठा आवाज काढील की अडाणी बाई? असा प्रश्न कधीकधी मनात येतो. अर्थातच, मला तुमच्या उत्तराचा अंदाज आहे.
शनिवारी एका कार्यक्रमात काही आदिवासी महिलांना त्यांच्या हक्कांसाठी अत्यंत खमकेपणानं मांडणी करताना बघितलं. तेव्हा मला असं वाटलं, की आपण शिकलो खरे, पण हक्कांसाठी असा आतड्यापासून आवाज काढायला नाही जमलं कधी. शिकलेल्या माणसाच्या अंगी शेळपटपणा भिनत जातो की काय असंही वाटलं क्षणभर. 'शिकलेली' माणसं त्यांच्यावर अन्याय झाला, कितीही त्रास झाला तरी आतली धुम्मस नीट बाहेर पडू देत नाहीत. फार झालं तर घरातल्या माणसांवर थोडाफार राग काढणार, बाहेर पुन्हा अंगात नेभळटपणा संचारतो. ह्याची हळूहळू सवय लागत जाते आणि नंतर प्रवृत्तीच बनते ती. अशी की, शेवटी लव्हाळ्यापेक्षाही लवचिक मान तयार होते. ती निमूटपणे वाकते सगळीकडे. मग उंटाच्या पाठीवर कधीही शेवटची काडी पडत नाही. जे आलं, ते सोसलं अशी अवस्था होऊन जाते.
काय आहे हे?
कशाचे परिणाम आहेत हे?
(शिकून विवेकी मांडणी करता येते, समस्या नीट हाताळता येते वगैरे सगळं मान्यच आहे. शिक्षणव्यवस्थेला तूर्त मुद्द्यावर दोष देण्याचा देखील माझा हेतू नाही. पण ह्या प्रश्नाबाबत पहिल्या घटकेला मनात जे आलं, ते हे असं.)