बा..ई...प...ण ( भाग ४ )
X
मानवी जीवनात आनंदाचे अनेक सोहळे असतात. हे सोहळे साजरे करण्याच्या काही पध्दती लोकमान्य आहेत . अपत्यप्राप्तीचा सोहळा हा एक असाच आनंददायी सोहळा असतो. सारे कुटुंब यामध्ये सामील होते. आपल्या घरात लहान बाळं येतयं याचा आनंद मोठा असतो. पण मानवी स्वाभाव एकदा आडं यायला लागला की मग या सोहळ्यातही काही कडू घोट मिसळतात. हे इतके कडू असतात की थेटपणे ते विषमतेची पाठराखण करतात. म्हणून त्यांना सतत वेगवेगळ्या मार्गाने उघडं पाडले पाहिजे .
मुलीचा जन्म...हा किमान काही घरात तरी नक्कीच आनंदसोहळा नसतो. जन्माला आलेले बाळं ही लिंगाने स्त्री आहे असे कळताच जैविक आईबापापासून इतरही बरेच नाकं मुरडणारे असतात. याचे कारण त्यांना " वंशाला दिवा हवा असतो , पणती नाही " हेच असते. अगदी जन्मदात्री आईदेखील नाखूश असते हे कटूसत्य आपल्या आजूबाजूला सहज पाहू शकतो. ही नाखूशी एकेक विषमतेला जन्म घालते व बळ पुरवते. मुलगा झाला हो हे सांगणारा आनंदी चेहरा आणि मुलगी झाली हो अस सांगणारा केविलवाणा चेहरा बरेच अंतरंग उघड करत आसतो.मुलगा झाला की बाळंतिणीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. पण मुलगी जन्माला घालणाऱ्या आईच्या वाट्याला फारसे काही येण कठीण असते हे जहरी वास्तव आहे. नाईलाजापोटी अथवा लज्जेपायी जे करता येईल तेवढ्यात भागवले जाते. मुलगा झाल्याचा आनंद मलई पेढे वाटून केला जातो. मुलगी झाल्यावर जिलेबी दिली जाते. छोटी असतील पण ही विषमतेची रुपे आहेत हे ध्यानात घ्यावे . मुलगा झाला की बारसे जोरात होते. मटणाच्या पंक्ती होतात. मुलगी झाल्यानंतर काही गोष्टीना थेट कात्री लावली जाते. मुलीच्या जन्माचे स्वागत अशा विषमतेच्या पध्दतीने होताना पाहून मनं विदीर्ण होते. कोणताही पुरुष हा स्त्रीच्या पोटातूनच जन्मतो , तिच्या स्तनातील दूधावर पोसला जातो , तिच्या मायेच्या वात्सल्याने मोहरून उठतो असा पुरुष आपल्या घरी जेव्हा त्या स्त्रीचे बालरुप जन्म घेते तेव्हा मात्र दुःख का व्यक्त करतो ?? याला काही धार्मिक सामाजिक आर्थिक कारणे आहेत .ही सगळी कारणे बाजूला ठेवून मानवतेच्या एकाच बाजूने उभे राहून स्त्री जन्माचे स्वागत पुरुष जन्माच्या स्वागताच्या बरोबरीनेच व्हायला हवे असे माझे स्पष्ट मत आहे. विषमता ही अलगपणाचे व्यवहाराला जन्म घालते. हे अलगपणाचे व्यवहार माणुसकीला कलंक असतात. एकदा का आपण या विषमतेला बळी पडलो की मग विषमतेच्या जागा अधिकाधिक मोठ्या होत जातात. हे टाळायला हवे. याची सुरुवात आपल्या घरी मुलगी जन्माला येईल तेव्हा तिचे जोरदार स्वागत करून करायला हवी .
माणसांनो...विषमता हे चढत जाणारे व्यसन आहे. एकदा याची लागण झाली की मग उत्तरोत्तर ती आपल्या व्यवहारात वाढत जाते आणि आपण मानवता हरवत जातो. स्त्री जन्माचे वेळी केलेला अविवेकी व्यवहार मग पुढे पुढे त्या स्त्रीचे कुटुंबातील स्थान दुय्यम होत जाते.कालांतराने समाजातील स्थान दुय्यम होते. हे योग्य आहे का ? विचार करा. हे रोखायचं असेल तर ..स्त्री जन्माचे स्वागत मनापासून करा.
!! स्त्री जन्माला ..हीन लेखू नका !!