बा..ई..प..ण ( भाग ६ )
X
जगावे तर आनंदानं हसतखेळत , गाणे म्हणत अस सांगितलं जाते. याचा अर्थ असा की कुढत जगण्यापेक्षा आनंदानं जीवन व्यतीत करा. एका अर्थी हे बरोबरच आहे. जीवनाचा आनंद सर्व पातळीवर प्रत्येक जीवाला घेता यावा अशी पृथ्वीवर मनुष्य जेव्हा रचना उभारेल तो दिवस विश्वाच्या आजवरच्या जीवनातील सर्वोत्तम दिवस समजावा. खरे बोलायचं तर कुढत बसणे कुणालाच आवडत नसते. व्यक्ती विशेषतः स्त्रीवर्ग आतल्या आत कुढत जगतो याचे एक मुख्य कारण म्हणजे लहानपणापासून तिच्या मनावर केले गेलेले काही संस्कार ...
कुढणे आणि स्त्रीसमाज...यांचे अविभाज्य असे नातं जडलयं. आपल्या मनात जे येईल ते स्पष्ट बोलता येत नाही , करणे तर दूरच राहते. अशावेळी पुन्हा समजूतीच्या नावाखाली तिच्या कडे एकेक " दान " मागितले जाते. आणि तीही मनात कुढतकुढत ते देऊन टाकते. घरामध्ये मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये असतात तेव्हा तर मुलासाठी मुलीकडून दान घेणे कुटुंबियाना कधीच गैर वाटत नाही . विषय शिक्षणाचा आला की मुलगा शिकू दे , तुला काय धुणंभांडी चुकलयं का अशी " समजूत " प्रेमळ दटावणी करून केली जाते. आपल्या भावासाठी हे " दान" ती देऊन टाकते. सणउत्सवाला आपल्या भावापेक्षा कमी पैसा आपल्यावर खर्च होतो हे तिच्या नजरेतून कधी सुटत नाही . तरीही मनात कुढत बसून चेहऱ्यावर हास्य आणत जगण्याची तिने स्वतःला सवय केलेली असते. घरगुती कामं अथवा अभ्यास यात निवड करण्याची पाळी आली तर पहिली निवड तिला घरगुती कामाचीच करावी लागते हे सत्य आहे. याउलट मुलासाठी मात्र घरगुती कामापेक्षा अभ्यास महत्त्वाचा सांगितला जातो . उघड्या डोळ्यांनी सारे बघणारी " ती " कुढत कुढत जगत असते. कुणाला बोलणे कठीण होतृ. सारे कुटुंबच पूर्वसंस्कार प्रभावाखाली असल्यामुळे तिच्या बोलण्याची कुणी दखल घेणेही कठीण. लहानपणापासूनच " स्त्री हळुवारपणे हवी तशी घडवली जाते " हे कटू वास्तव आहे. हे कुठं वर चालणार आणि मानवी समाजाला नेणार तरी कुठं ? विचार व्हायला हवा.
माणसांनो...स्त्री समाजाकडून आपण अगदी सहजगत्या व बेमालूमपणे काही दानं घेत आसतो. ती स्त्री नात्यानं कुणी आसेल आपली , पण प्रथम ती " माणूस " आहे याची जाणीव ठेवा. तिलाही मनं आहे , भावभावना आहेत , तिलाही रडायचं असते , हसायचे असते मनसोक्त . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिलाही तिच्या भावासारखे " मुक्त फुलायचे असते " . याकरिता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले घरगुती वातावरण अत्यंत निरोगी ठेवा. कुढत बसणारा एकही चेहरा त्यामध्ये असू नये याची सहृदयतेने काळजी घ्या .
!!पोरासाठी पोरीकडून दानं...ही पध्दती थांबवायला हवी !!