बा..ई..प..ण ( भाग ३ )
X
आपल्या देशात व जगातही एक धारणा बहुतांशी लोकात विद्यमान आहे. हे जग देवबाप्पाने बनवले आहे आणि या जगातील माणसाचा संपूर्ण व्यवहार हा त्या विधात्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. या धारणेशी मी अजिबात सहमत नाही . तरीही ही धारणा बरोबर आहे असे मानून स्त्री जीवनातील एका मोठ्या वेदनेकडे पाहिले तर ?प्रयत्न तर करुया...
स्त्रीभ्रुण हत्या....हा आजकालचा एक ज्वलंत प्रश्न आहे. कधीकाळी स्त्री पुरुष ही लोकसंख्या समसमान होती . पण गेल्या काही वर्षात यात दिवसेंदिवस मोठी तफावत आढळून येत आहे. स्त्री जन्माला येऊच नये याकरिता आईच्या गर्भातच तिचा गळा घोटून टाकायचा . यामुळेच आजकाल बरेच ठिकाणी अर्थात दवाखान्यातील कचरा अथवा अगदी कचराकोंडाळ्यातही स्त्री भ्रुण मेलेल्या अवस्थेत आढळून येतात. मानवी जीवनात विशेषतः स्त्री जीवनात वांझपण हे अत्यंत वाईट मानले जाते. ( मी स्वतः याबाबतीत असहमत आहे ) आपल्या संसारवेलीवर एका फुलाचे आगमन होणार या कल्पनेनेच दांपत्य जीवन आनंदाने न्हाऊन निघते. पण अनेक विविध कारणाने आजकाल या आनंदाला एक विकृत वळण लागले आहे. विज्ञानाच्या यंत्रावर आपल्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे ओळखता येऊ लागले आणि स्त्रीभ्रुण हत्या सर्रास घडू लागल्या . आपल्या वंशाला फक्त दिवाच हवा , पणती नको अशी अत्यंत वाईट धारणेने समाजमनावर कब्जा केला. याचाच परिणाम म्हणून स्त्री जन्माला यायचे आधीच गर्भात मारली जाऊ लागली . वस्तुतः बहुतांशी स्त्री पुरुष " विधात्याच्या इच्छेला " मान तुकवणारे असतात. मग त्यांच्याच धारणेनुसार जर विधात्याने त्यांच्या पोटी मुलगी जन्माला घालायची ठरावली असेल तर ...तर मग त्याच्या इच्छेला पायदळी का तुडवले जाते ? विधात्यापेक्षा ही खूनी माणसे अधिक सामर्थ्य बाळगून असतात का ? ...वास्तविक या जगात जन्माला येण्याचा , इथे वास्तव्य करण्याचा आणि आनंदाने जीवन व्यातीत करण्याचा अधिकार प्राणीमात्रातील सर्व सजीवाना समान आहे. असे सत्य असताना " सर्वात हुशार समजली जाणारी मानवजात " आपल्याच कावजाच्या तुकड्याला जन्माआधीच कसे काय मारून टाकते ?? असा क्रुर व्यवहार इतर हिंस्त्र समजले जाणाऱ्या वाघ सिंह यांच्या सारखे प्राणीही करत नसतात. मग मनुष्य या सर्वाहून अधिक क्रुर आहे हे दाखविण्याचे " स्त्रीभ्रुण हत्या " हे उदाहरण आहे का ?? ...माझ्या समजूतीने मनुष्य हा या विश्वातील सर्वात समंजस , हुशार , दुरदृष्टी बाळगणारा प्राणी आहे. मग त्याची ही अक्कल नेमके स्त्री समाजाच्या बाबतीत कुठं शेणं खायला जाते ?? विचार व्हायला हवा. दिवसेंदिवस स्त्री कमी होणे याचा स्पष्ट अर्थ वसुंधरेचा समतोल आपण आपल्या हाताने गमावतोय. जे वसुंधरेबरोबरच मानवी समाजालाही नुकसानकारक आहे. मानवी समाजात याबाबतीत शहाणपण लौकर वृध्दीगत व्हावे हीच सदिच्छा .
माणसांनो....एकटा पुरुष आपले जीवन या पृथ्वीवर किती काळ घालवू शकेल ? फार काळ निश्चितच नाही. मनुष्याच्या हरेक सुखात व दुःखात त्याच्या सवे आई , पत्नी , बहीण , मुलगी , सखी अशा विविध नात्यातून ती आपल्याला साथ करत असते. तिची ही साथ मानवी जीवनाला उपकारकच ठरलीय यात शंका नाहीच. असे असताना मनुष्य स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर " स्त्रीभ्रुण हत्या " करून भविष्य अंधकारमय का करतो ? साकल्याने व सदसदविवेकबुध्दी शाबूत राखून विचार करा...एवढेच .
!! स्त्रीभ्रुण हत्या ..हा मानवतेवर कलंक आहे !!