Home > मॅक्स ब्लॉग्ज > बा..ई...प....ण ( भाग १५ )

बा..ई...प....ण ( भाग १५ )

बा..ई...प....ण ( भाग १५ )
X

चक्रव्युह ..फक्त महाभारत नावाच्या ग्रंथातच विद्यमान आहे असे नव्हे . रोजच्या जीवनातही तो चक्रव्युह गतिमान असतो. कधी डोळ्यांना दिसतो तर कधी डोळ्याआड असतो. कधी तो भेदला जातोही पण बरेचदा चक्रव्युह म्हणजे मरणच असते. अशा या चक्रव्युहात जेव्हा व्यक्ती अडकते तेव्हा तिची सुटका कठीण. कारण पृष्ठभागावर सर्व शस्त्रे घेऊन उभे असतात हिस्त्र श्वापदे. आपल्या अक्राळविक्राळ हावभावानी व घातक नजरेनं टोचत असतात चक्रव्युह मध्ये अडकलेल्या सावजाला. कधी इतकी बेमालूम हत्या होते की , हत्या ज्याची होते , दोष त्यालाच दिला जातो.,..स्त्री जीवनात असे चक्रव्युह विशेष असतात.

चक्रव्युह आणि स्त्रीसमाज...कधीतरी यावर बोललेच पाहिजे . स्त्री नावाच्या घटकाचे जेव्हा शोषण होते तेव्हा तिचे शोषण करणारा घटक हा साहजिकच पुरुषसत्ताक व्यावास्थेचा समर्थक असतो. तो बहुतांशी वेळा पुरुष असला तरी कधीकधी खुद्द स्त्री देखील यात सामिल असते सकृतदर्शनी. मग त्या सामिल असणाऱ्या स्त्रीलाच पुढे करून ज्या स्त्रीला चक्रव्युह मध्ये अडकवलेले असते तिची " मुख्य शत्रू " म्हणून पुढे दाखवली जाते. अशाने होते असे की , " दाखवलेल्या स्त्री आडून " पुरुषसत्ताक व्यवस्था आपली कामे चालू ठेवते. " स्त्री हीच स्त्रीची मुख्य शत्रू असते " असे विधान सर्रास ऐकवले जाते. समर्थनार्थ काही उदाहरणे समोर ठेवली जातात. घरगुती वर्चस्वात सासू सुनेला छळत असते , घरची सून सासूला घराबाहेर काढते , हुंडाबळीमध्ये सासू सहभागी असते वगैरे वगैरे उदाहरणे समोर केली जातात. यामध्ये निश्चितच काही तथ्यांश असतो. पण हे काही प्रश्नाचा " गाभा " असल्याचे लक्षण निश्चितच नाही . पुरुषसत्ताक व्यवस्था हे मुख्य कारण असते. एका शोषीताला दुसऱ्या शोषीताचे विरोधात काम करायला लावणे हे या व्यवस्थेचे यच्छावेदक लक्षण आहे. खोटं शत्रू समोर करून , आपण नामानिराळे रहायचे हीच रीत असते या पुरुषसत्ताक व्यवस्थेची. स्त्री समाजाला हरेक पध्दतीने बंदिस्त करण्यासाठी असे अनेक चक्रव्युह अत्यंत कौशल्याने रचले जातात. शोषीतापैकी अगदी काही घटक यामध्ये सामील होऊन ती व्यवस्था पुढे राखतात. आणि ही व्यवस्था अगदी हुशारीने आपल्याला सामिल झालेल्या शोषीत घटकानाच समोर करून " हा पहा तुमचा शत्रू " असे दाखवून आपली व्यवस्था कायम राखते. हे गौडबंगाल समस्त स्त्री वर्गाला अगदी लौकर समजायला हवे. चक्रव्युहात शिरणे जितके महत्त्वाचे असते त्याहून महत्त्वाचे असते चक्रव्युह भेदायचे कसे हे माहिती असणे. पुरुषसत्ताक व्यवस्थेचा नीट , शास्त्रीय अभ्यास करून हा चक्रव्युह किमान आपल्यापुरता निश्चितच भेदणे शक्य होईल. पण समस्त स्त्री समाजच जिथे या चक्रव्युह मध्ये अडकलाय तिथे वैयक्तिक सुटका महत्त्वाची कशी मानायची ? पुरुषसत्ताक व्यवस्था जरी " स्त्रीच स्त्रीची शत्रू " असे चित्र रंगवण्यात यशस्वी झाली असली तरी....तरीही एकीची वज्रमूठ उगारून , एकमेकीना सहाय्य करतच चक्रव्युह भेदत , " स्त्री हीच स्त्रीची खरी मदतानीस आहे " हे दाखवायला हवे....आव्हान निश्चितच आहे , पण आव्हान पेलायालाच हवे.

माणसांनो...चक्रव्युह रचना एका रणांगणावर केली जाते. पण पुरुषसत्ताक व्यवस्थेने समस्त स्त्रीसमाज बंदिस्त करण्याचे हेतूने पावलापावलावर छोटे मोठे चक्रव्युह रचून ठेवलेत. यामध्ये अलगद बळी जातोय तो स्त्रीचा. अशावेळी ....एक जबाबदार व विवेकी मनुष्य म्हणून आपण त्या पिचल्या जाणाऱ्या स्त्री वर्गाबरोबर लढायला तयार असायला हवे. यामुळे त्यांना निश्चितच आधार मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे आपण " माणूस " असल्याची आपलीच खात्री पटेल. आहात का तयार...स्त्रीभोवतीचा चक्रव्युह भेदायला ??

!! स्त्री हीच स्त्रीची खरी मदतनीस आहे...!!

Updated : 10 Dec 2018 3:21 PM IST
Next Story
Share it
Top