बा..ई...प...ण ( भाग १ )
X
विश्वाची निम्मी लोकसंख्या कधीकाळी स्त्री नावाच्या जातीने भरुन टाकली होती . मानवी जीवनाच्या अगदी सुरुवातीच्या जडणघडणीचे काळात एक मोठा सन्मानही तिच्या वाट्याला आला होता. " मातृसत्ताक पध्दती " रुपाने तिने काही काळ समाजमनावर अधिराज्यही गाजवलयं. पण हा सारा " सुवर्णकाळ " सरून गेला आणि एक मोठी वेदनेची पोकळी स्त्री जीवनात तयार झाली. ही पोकळी जितक्या लौकर मानवी समाजातून हद्दपार होईल तितक्या लवकर मानवी जीवन चहूअंगाने बहरेल यात शंका नाही . या पृथ्वीवर तिने पाय ठेवला तोच मुळी एका " शापवाणीने "...आजही ही शापवाणी तिला छळत असते.
आदम आणि ईव....ही पृथ्वीवर आलेली पहिली स्त्री पुरुष जोडी म्हणून सांगितली जाते. देवाने या दोघांना एका छान उद्यानात वसवले होते. फक्त एक महत्त्वाची अट होती की , या उद्यानात असणाऱ्या " ज्ञानवृक्षाचे फळ " खायचे नाही . उद्यानातीलच एका सर्पाने म्हणे इव्हला तयार केले आणि मग इव्हने आदमला तयार करून त्या " ज्ञानवृक्षाचे फळ " खायला लावले. देवाज्ञा मोडली अन् हे पाहून देवाने दोघानाही शाप देऊन मृत्यूलोकात पाठवले अशी सर्वसाधारण कथा आहे. ...या कथेतील इव्ह म्हणजे आजवरची स्त्री ही आजही हा शाप भोगतेय असे म्हटले तर वावगे नाही . शाप अथवा शापवाणी हे शब्द प्रतिकात्मक रुपात पहायला हवेत. स्त्री जीवनाच्या वाट्याला आलेले हे शापमय भोग संपणार कधी हा पृथ्वीवरचा सर्वात गहन व महत्त्वाचा प्रश्न आहे. आजही वेगवेगळ्या रुपात " ज्ञानवृक्षाचे फळ " चाखण्याची स्त्रीला संधी उपलब्ध नाही . आणि त्याहून वाईट म्हणजे आजचा आदमच तिला या वेगवेगळ्या शापवाणीत गुरफटून ठेवत आहे. ( सन्माननीय अपवाद ) अशातून स्त्री मुक्ती कशी साधणार ? की आयुष्यात वेगवेगळ्या शापाच्या फेऱ्यामधूनच ती फिरत राहणार ? कधीतरी देव नावाची गोष्ट स्त्रीला " माणूस " म्हणून स्विकारुन तिचे अधिकार व हक्क तिला बहाल करणार का ?..प्रश्न अनेक आहेत , गहन आहेत. पण एवढे खरे की " आजची इव्ह " एका वेळेस ही शापवाणीचे भोग मोडून काढेल निश्चितच . मला विश्वास आहे. तुम्हाला ??
माणसांनो..स्त्री म्हणून जन्माला येण हे भारतीयच नव्हे तर अगदी जागतिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात नकारात्मक धारणा वाढवणारे ठरत आहे. सगळे दोष तिच्या माथ्यावर , सगळे साखळदंड तिच्या शरीराला लपेटलेले , सगळे तीक्ष्ण घावं तिच्या डोळ्यांत निर्घूणपणे खुपसलेले अशा अत्यंत वाईट अवस्थेत स्त्री समाज जगत आलाय. आपल्याला याचि जाणीव हवीच. नुसती जाणीवच नव्हे तर...तिच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक शापवाणीला व्यवहारात निष्प्रभ करण्यासाठी आपण तिला साथ करायला हवी. आहे का तयारी ??
!! स्त्री जन्माचे शाप...एकदा संपलेच पाहिजेत !!