Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्त्री आणि सेक्स

स्त्री आणि सेक्स

स्त्री आणि सेक्स
X

वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होण्यात समाधानी लैंगिक जीवनाचा फार मोठा वाटा आहे. वैवाहिक जीवनात सुखदुःखाचा वाटा पतीपत्नीनं समानतेने उचलावा असं जर मानलं, तर लैंगिक जीवनात मात्र ती भोग्य वस्तू का ठरावी? भावनेच्या भरात तिनं आपली इच्छा व्यक्त केली तर तिला वाईट चालीची कामिनी मानावयाचे आणि क्वचित प्रसंगी तिनं नापसंती दर्शविली, तरी ती धर्मपत्नी म्हणून तिच्या मनाविरुद्ध समागम करावयाचा, हा कुठला न्याय?

मला लवकर मरण येईल, असं कुठलं तरी औषध द्या डॉक्टर!" असं समुपदेशकाला एक मध्यमवयीन स्त्री त्राग्यानं म्हणाली. तिला शांत करत समुपदेशकाने तिची माहिती विचारली, तेव्हा कळालं की, बाई अतिशय त्रासलेली होती. निर्व्यसनी नवरा मोठ्या पगाराच्या चांगल्या नोकरीवर होता. घरात आर्थिक सुबत्ता होती. मुलाबाळांमुळं घरात गोकुळ नांदत होतं. तरीही ही बाई अतिशय त्रासलेली होती. आपली हकीकत डॉक्टरला सांगत ती म्हणाली, " काय सांगू डॉक्टर तुम्हाला? कमी म्हणावं, असं घरात काहीही नाही. सगळं आहे, पण माझा त्रास ना कुणाजवळ सांगता येतो, ना बोलता येतं. त्यामुळे मरून जावंसं वाटतंय."

"असा काय त्रास होतो आहे तुम्हाला?"

"काय सांगू डॉक्टर, माझ्या नवऱ्याला कधीही झोपायचं असतं माझ्यासोबत! वेळ नाही, काळ नाही. घरात कोणी आहे-नाही. त्याला कशाचं काही नसतं. त्याची इच्छा झाली की तो बोलवतो. माझं तर मरणच आहे याच्यात. घरात सासू सासरे मलाच बोल लावतात. कामं उरकली नाही, तरी नवरा चिडतो. कुणाला काय सांगावं, तेच समजत नाही. नवऱ्याला काही सांगायला गेलं की म्हणतो, तू आहेसच इतकी सुंदर!" या हकीकतीवरून आपल्या लक्षात येतं, की नवऱ्याला त्याची बायको सुंदर आहे, इतकंच कळतंय. मात्र ती या सुखापासून वंचित राहाते आहे, हे मात्र त्याला कळत नाहीय. किंवा स्त्रीचीही इच्छा होऊ शकते कामसुखासाठी, याची त्याला जाणीवच नाहीय.

लैंगिक संबंधांच्या बाबतीत आपण अनेक गैरसमजुतींचे बळी आहोत. सेक्स म्हणजे आपली मर्दुमकी गाजवायचे ठिकाण. सेक्सचा सरळ सरळ संबंध हा शारीरिक स्वास्थ्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या पुरुष हा स्त्रीपेक्षा वरचढ असल्याने स्त्रीला कामसुख देण्याची जबाबदारीही पुरुषाचीच! मात्र ही जबाबदारी पुरुषाकडे देताना आपण स्त्रीला इथेही दुय्यमच स्थान दिलं. लैंगिक क्रियेत तिचा सहभाग हा पुरुषाइतकाच महत्वाचा आहे. स्त्री पुरुषाची बरोबरी करूच शकत नाही, म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, मुलबाळ वगैरे गरजा भागत असताना इतर गोष्टींत पत्नीने हरकत घेऊ नये, असे अनेक सुशिक्षित तरुणांचा समज (?) आहे. पत्नीच्या भावनांची कदर व हक्कांबाबत विचार करायची यांची तयारी नाही. पत्नी हे एक शरीर असून ते केवळ भोगण्यासाठी आहे, असंच समजून अनेक जण वर्षानुवर्षे संसार (?) करत राहतात. शरीराच्या केवळ बाह्यरूपात गुंतल्यामुळे कामभाव तृप्तीच्या अंतरंगापर्यंत हे पोहोचूच शकत नाहीत.

केवळ वीर्यपतन करण्यासाठी स्त्रीच्या योनीचा पुरुषानं वापर करणं म्हणजे संभोग, असा संकुचित अर्थ अनेक जण लावतात. असा समज केवळ पुरुषच करून घेतात, असं नाही, तर अनेक स्त्रियाही असा गैरसमजाच्या बळी आहेत. वास्तविक पाहता अशा प्रकारे झालेला संभोग हा कधीही आनंददायी असू शकत नाही. त्यातून तृप्ती अथवा शांती मिळत नाही. उलट इंद्रियसुखाबाबत चुकीच्या कल्पना तयार होऊन, वासना धगधगत राहते. सेक्स म्हणजे पती पत्नीच्या प्रेमाचे सहजपणे, उत्स्फुर्तपणे लिंगाद्वारे व्यक्त झालेला आविष्कार आहे. निवांत क्षणी पती-पत्नी एकमेकांच्या ओढीने एकमेकांत मिसळतात. 'प्राणिजगतामध्ये सेक्स म्हणजे समागमाची इच्छा- डिझायर टू कॉप्युलेट! पण मानवाच्या सेक्समध्ये झालेल्या उत्क्रांतीमुळे सेक्स केवळ क्रिया न राहता एक नाते बनले आहे. म्हणूनच मानवात सेक्स हा रोमँटिकपणाचा प्रवास असून त्याचा शेवट लिंग-योनी संबंध आहे. म्हणजेच हा एंड पॉइंट आहे; सेंट्रल पॉइंट-केंद्रबिंदू नाही; परंतु हा रोमँटिक प्रवास टाळून लिंग-योनी संबंधाला जेव्हा केंद्रबिंदू केले जाते, म्हणजे त्याच्याचसाठी सर्व काही केले जाते, तेव्हा लैंगिक समस्या उद्भवतात. मात्र या सर्व प्रवासात स्त्रीचाही सहभाग असणं गरजेचं असतं.

पुरुषाप्रमाणेच स्त्रीही या दिव्य अनुभवाची अधिकारी आहे. दोघांपैकी एकाला जर संभोगाची इच्छा नसेल तर दुसराही त्या वेळेस संभोग न करण्यातच समाधान मानतो, कारण त्याने तृप्तीचा अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे रोजच हे घडले पाहिजे, याचा अट्टाहास नसतो. तेवढी स्थिरता बुद्धीला आलेली असते.

स्त्रीच्या संपूर्ण सहकार्याशिवाय खऱ्या संभोगसुखाची ओळख पुरुषाला होत नाही, लैंगिक तृप्तीही मिळत नाही. संबंधातून अपेक्षित असलेल्या मानसिक आनंदापासून वंचित राहावे लागते. स्त्रीला कामोत्तेजित करण्याविषयी अज्ञानातून किंवा पुरुषी अहंकारातून पुरुष आक्रमक बनतात आणि केवळ विर्यपतनाच्या धुंदीत स्वतःला गुरफटून घेतात. आपण विज्ञानयुगात वावरतो; मात्र, तरीही स्त्री पुरुष समानता ही केवळ पुस्तकात ठेवण्यात धन्यता मानतो. याचा प्रत्यय देणारे अनेक प्रसंग घडतात. केवळ लग्नाच्या पहिल्या रात्री मनमोकळा शृंगार स्त्रीने केला म्हणून घटस्फोटासाठी येणारे अनेक जण जेव्हा दिसतात, तेव्हा आपण लैंगिक शिक्षणाबाबत आजही आपण किती मागास आहोत, याचा प्रत्यय येतो. आपली पत्नी कामसंबंधात निःसंकोचपणाने सहभागी होते, म्हणजे तिने आधी संभोग केलेला आहे, अथवा ती वाईट चालीची आहे, असे म्हणणारेही मोठ्या संख्येने सापडतात. कुठलीही स्त्रीही शृंगाराच्या बाबतीत मानमोकळेपणा दाखवू शकत नाही, असे भल्या भल्या उच्चशिक्षितांचे मत आहे. हा तर कामजीवनातील जुनाट, बुरसटलेल्या विचारांचा नमुना आहे. पुरुष भोक्ता आणि स्त्री भोगदासी या अज्ञानावर आधारलेले कामजीवन आजही अनेक दांपत्ये उपभोगत आहेत. आधुनिक युगातील सर्व सुखसोयींचा उपभोग घ्यायचा, मात्र स्त्रीबाबत विचार करताना कालबाह्य दंडकेच प्रमाणित मानायची, असा हा सारा दुटप्पीपणाचा मामला आहे.

स्त्रीने श्रम करावेत, पैसा कमावण्यासाठी बुद्धी वापरावी, मात्र जिथे कामजीवनाचा संबंध येतो, तिथे मात्र तिने पुरुषाचेच वर्चस्व ग्राह्य धरावे, असा आग्रह करणारे अनेक तरुण आपल्याला सापडतात. तिथे तिने फक्त पुरुषाच्या समाधानासाठीच आणि पुरुष म्हणेल तसंच तिनं तिचं शरीर वापरू दिलं पाहिजे, असा आग्रह करणारे अनेक पुरुषी मनोवृत्तीचे तरुण आजुबाजुला सापडतील. ही वृत्ती मनात खोलवर रुजलेली आहे. स्त्रीने पुरूषाचं शरीर भोगण्याची इच्छा धरावी, असा विचार म्हणजे पुरुषाला स्त्रीची विकृतीच वाटते. अशी इच्छा पुरुषाने केली तर चालते; मात्र, तीच इच्छा स्त्रीने केली तर ती त्यांच्या लेखी गलिच्छ ठरते. स्त्रीने नेहमी शुध्द-पवित्रच असलं पाहिजे. कामभोगाची वासना तिच्या ठायी उत्पन्न होताच ती अपवित्र ठरते, असा अत्यंत चुकीचा विचार परंपरेनं पुरुषांच्या तसंच कित्येक स्त्रियांच्याही मनात असतो. जणु काही स्त्री ही मनुष्यच नाही, तिला मेंदूच नाही. योनीपासून मेंदूपर्यंत संवेदना नेणारे ज्ञानतंतूच तिच्यात नाहीत, की या संवेदनांचा अर्थच तिला कळत नाही, असे या वर्गाचे मानणे असावे.

हे सर्व वैज्ञानिकदृष्ट्या हास्यास्पद आहे. वास्तविक हा सर्व मनोवृत्तीचा आणि परंपरेचा खेळ आहे. स्त्रीही एक मनुष्य आहे, तिलाही लैंगिक जाणीवा आहे. त्या व्यक्त करण्यात पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्येही वैविध्य आहे. याचा अर्थ असा नाही की तिला लैंगिक जाणिवाच नाहीत. ज्याप्रमाणे पुरुषाचे शरीर काम करते, त्याचप्रमाणे स्त्रीचेही शरीर काम करत असते. अनेकदा मुले झाल्यानंतर स्त्रिया मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करतात. तेव्हा काही प्रमाणात कदाचित त्यांची कामभावना कमी होतो. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात कामभावच नसतो. तो असतोच, ज्याप्रमाणे पुरुषात असतो. वस्तुतः वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होण्यात समाधानी लैंगिक जीवनाचा फार मोठा वाटा आहे. वैवाहिक जीवनात सुखदुःखाचा वाटा पतीपत्नीनं समानतेने उचलावा असं जर मानलं, तर लैंगिक जीवनात मात्र ती भोग्य वस्तू का ठरावी? भावनेच्या भरात तिनं आपली इच्छा व्यक्त केली तर तिला वाईट चालीची कामिनी मानावयाचे आणि क्वचित प्रसंगी तिनं नापसंती दर्शविली, तरी ती धर्मपत्नी म्हणून तिच्या मनाविरुद्ध समागम करावयाचा, हा कुठला न्याय? गर्भारपण-बाळंतपण ह्या सातत्याने येत राहणाऱ्या दिव्यातून ती आता कुठं मोकळी होऊ पाहाते आहे आणि लैंगिक जीवनाचा मोकळेपणानं आनंद घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी तिच्या निरनिराळ्या वयातील भूमिकेनुरूप तिला लैंगिक ज्ञान मिळाले – मुलगी, तरुणी, नववधू, पत्नी आणि माता या सर्व अवस्थेत तिला योग्य मार्गदर्शन मिळालं तर लैंगिक शिक्षण हा सुखाचा मूलमंत्र ठरेल.

त्यामुळे आपल्या लैंगिक इच्छा पतीकडे बोलून दाखवणे, त्या इच्छा पतीद्वारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं, यामुळे ती स्त्री विकृत ठरत नाही. ज्याप्रमाणे पुरुषानं आपल्या कामभावना आपल्या पत्नीद्वारे पूर्ण करणे गैर नाही; त्याचप्रमाणे स्त्रियांनी व्यक्त होणं, यात कुठली आली विकृती? व्यक्त होण्याची, भिन्नलिंगी सहवासात आपलं व्यक्तीमत्त्व खुलवण्याची, आधाराची, प्रेमाची ज्याप्रमाणे पुरुषाची एक मनुष्य म्हणुन मुलभूत गरज असते, तशीच मुलभूत गरज स्त्रीचीही असते. सेक्स ही प्रेमाची अत्युच्च अभिव्यक्ती आहे. शारीरिक असली तरी अनेक मानसिक गोष्टी यात अंतर्भूत आहेत. सेक्समध्ये स्त्रीकडून मिळणारा मनमोकळा प्रतिसाद, हा निखळ अभिव्यक्तीचं प्रतीकच. आनंद आणि तृप्ती मिळण्यासाठी ते आवश्यकच आहे. ज्या पत्नी सेक्सच्या वेळेस अभिव्यक्त होत नाहीत, मनमोकळा साद-प्रतिसाद देत नसतील, त्यांच्या पतींनी आपल्या पत्नीला खुलवण्याची कला आत्मसात केली पाहिजे. संभोगादरम्यान पत्नीचा अधिकाधिक प्रतिसाद कसा मिळवता येईल, यावर उलट विचार करायला हवा. जर स्त्री मनमोकळा शृंगार करत असेल, तर तिच्या मनाने तुम्हाला पुरतं स्वीकारलं असून प्रेमातलं हे एक यशच मानायला हरकत नाही.

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 17 July 2022 6:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top