दुष्काळाचे राजकारण न करता मुख्यमंत्र्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे - सुप्रिया सुळे
X
आज खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजीत केली होती. या परिषदेत त्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला धरुन बोलल्या. त्यांनी राज्यातील दुष्काळाबाबत संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
त्या म्हणाल्या की, "राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाचे राजकारण न करता मुख्यमंत्र्यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात त्वरीत दुष्काळ जाहीर करावा,"
पुढे त्यांनी शासनाच्या कारभारावर बोट ठेवले व टिका केली, त्या म्हणाल्या, "राज्याच्या विविध भागांत पाऊसच न पडल्यामुळे पाण्याची परिस्थिती अडचणीची बनली आहे. या दुष्काळामुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. मराठवाड्यासह इतर भागांत जलयुक्तशिवारासारखी योजना राबविताना मोठा गाजावाजा शासनाने केला. पब्लिसिटी मिळविण्यासाठी जोरजोरात घोषणाबाजीही करण्यात आली; पण यात प्रत्यक्षात श्रमदान किती झाले, "असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
"शासनाने शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. योजनांच्या जाहिरातबाजीसाठी जनतेचा पैसा वाया घालविला जात आहे, मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जिल्हाधिकारी व विभागीय कार्यालयांसमोर आंदोलनेही करण्यात येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता कोणतीही वाट न पाहाता दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे," असे वक्तव्य त्यांनी परिषदेत केले.
पाणीपुरवठ्याच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "पुणे शहराला खडकवासल्यातून तर, पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. हा पाणीपुरवठा करत असताना योग्य नियोजन करून समान पाणी वाटप झाले पाहिजे," असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
"बारामती लोकसभा मतदार संघातील अंगणवाड्यांमध्ये वीज, पाणी या दोन्ही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठकाही घेण्यात आल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, हिंजवडी येथील वाहतूक कोंडीचा प्रश्नी सोडविण्यासाठी एकतर्फी वाहतूक मार्गाचा पर्याय सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता वाहतूक कोंडीचा प्रश्न हळूहळू सुटेल," असा दिलासा त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना दिला.