Home > News Update > मेडिकल कॉलेजची लोकं दुटप्पी का बोलली ?

मेडिकल कॉलेजची लोकं दुटप्पी का बोलली ?

मेडिकल कॉलेजची लोकं दुटप्पी का बोलली ?
X

"ज्या दिवशी कॉलेजमध्ये आम्ही दाखल होतो तेव्हापासूनच जात आणि रिजर्वेशनवरून टोमणे सुरू होतात. हे केवळ सोबतचे विद्यार्थीच नाही तर टीचर देखील करतात." वैद्यकीय अभ्यासक्रमाला शिकणारी एक विद्यार्थीनी सांगत होती. " सर्व मित्र मैत्रिणी सोबत असताना तर असे अनुभव येतात. मात्र, आम्ही सर्व व्हॉट्स ऍपच्या गृपवर एकत्र असतो. तिथे रिजर्वेशन आणि जातीवरून पोस्ट शेअर करून जाणूनबुजून टार्गेट करण्याचे प्रकार आम्ही सहन करतो. टीचरजवळ तक्रार करायची म्हटलं तर ते ही त्यांच्या सोबतच असतात." आठवडाभराआधी 'सेव मेरीट, सेव नेशन' या कॅम्पेनद्वारे आंदोलन करण्यात आलं. तेव्हा तर संपूर्ण व्हॉट्सऍप गृप जातीविषयक टोमण्यांनी भरलेला होता."

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येनंतर एससी एसटी विद्यार्थ्यांचा होणारा अपमान हा विषय सोशल मीडियावर आला, तेव्हा तर एकाची मजल चक्क रिजर्वेशनसे आये हो, तो तुम्हे थोडी इन्सल्ट तो सहनी पडेगी" इतकं बोलण्यापर्यंत गेली, असा एक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी सांगत होता.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मंगळवारी (२८ मे) नागपूरमधील संविधान चौकात धरणे आंदोलन व कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. समता सैनिक दल व एससी, एसटी मेडिकल स्टुडंट असोसिएशन या संघटनाही सहभागी झाल्या होत्या. संध्याकाळी हा कार्यक्रम होता. मी स्टोरी कव्हर करायला गेलो. तेव्हा मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते आमच्याजवळ मन मोकळं करत होते. वेदनेला वाचा फोडत होते. या आंदोलनाला यासाठीही महत्त्व होतं कारण गेल्या आठवड्यातच नागपूरमध्ये 'सेव मेरीट, सेव नेशन' या कॅम्पनेद्वारे आरक्षणाला विरोध करण्यासाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केलं होतं. शिवाय संशयित आरोपीतील एक मुलगी ही नागपूरच्या शासकीय कॉलेजची पास आऊट विद्यार्थीनी होती हे विशेष.

नागपूरच्या संविधान चौकात डॉ. पायल तडवी यांना आदरांजली देण्यासाठी सुमारे दोनशेच्या जवळपास शिकाऊ डॉक्टर आले. यात काहींचे शिक्षण पूर्ण झालेले होते. समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी कार्यकर्ते आले. मीडिया आली. कार्यक्रमाला सुरूवात झाली. एक एक वक्ते आले. बोलू लागले. दुसरीकडे सात वाजून गेल्यामुळे अंधार पडायला सुरूवात झाली होती. पत्रकार मंडळी अंधार पडत असल्यामुळे बाईटसाठी घाई करत होते. भाषण थोडक्यात सुरूच होते. एक व्यक्त्याचं माईकवर भाषण सुरू झालं. अतिशय घणाघाती भाषण होतं. त्या मुली मॅनेजमेंट कोट्यातून आल्या होत्या. ब्राह्मण मुली, जातीभेद, मनुवाद असा प्रहार सुरू होता. अंधारामुळे बाईटची वाट पहणारे पत्रकार कधी अंधार तर कधी घड्याळाकडे बघत होते.

अखेर भाषण लवकर संपण्याचं चिन्ह दिसत नसल्यानं बाहेर येऊन तिथून बाजूला जाऊन मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू केली. एक मॅडम फाडफाड इंग्लिश बोलत बाजूच्या मुलींना आपला मुद्दा सांगत होत्या. कदाचित रेशीमबागेतून आल्या असाव्या असं मला वाटलं. त्यांनी डॉक्टर असल्याचे सांगितले. जातीभेद वगैरे सोडा मुळात आत्महत्या व्हायला नको. इथे सर्व जातीभेद, असमानता बद्दल बोलत आहेत. मात्र आत्महत्या विषयी कुणीच बोलत नाही. मी स्वत: आदिवासी समाजातून आल्याचंही त्या सांगायल्या विसरल्या नाहीत. दुसरीकडे भाषण संपण्याचं नाव नव्हतं. पत्रकार मंडळी बाईटसाठी वाट बघत होते. दुसरीकडे मॅडमसोबतची चर्चा रंगात आली होती. मेडिकल कॉलेजच्या मुलीही त्यांना टाळी देत दाद देत होत्या. अखेर त्यांनी त्या आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी काम करत असल्याचे सांगितले. तिथे आमची मदत घेतल्यास आत्महत्या कशी झाली नसती यावर बोलत होत्या. दुसरीकडे भाषण सुरूच होतं. आता अनेक मुलींनी त्या मॅडमचा मोबाईल नंबर शेअर केला. त्यातच "मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकार हाय हाय" अशा घोषणा ऐकायला आल्या. त्यामुळे भाषण संपल्याचं लक्षात आलं.

मीडिया प्रतिनिधी बाईट घेण्यासाठी आले. आम्हांला दोन मिनिटांची बाईट हवी होती. मात्र, बाईटची वेळ वाढत होती. अखेर एकच बाईट 15-20 मिनिटे आणखी लांबण्याची चिन्हं दिसल्यानं कॅमेरा बंद करून आम्ही पुन्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेलो. आता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मॅडम तिथे मोदींचे नारे लागल्याने मोदी मध्ये कुठे आले यावर चर्चा करत होत्या. दुसरीकडे आदिवासी होस्टेलच्या मुलाने आम्हाला कसे फुकटे म्हटलं जातं हे सांगितलं. मुलं एक एक अनुभव सांगत होते. कुणी आत्महत्या हा उपाय नाही तर लढायला पाहिजे होतं, अशी खंत व्यक्त करत होते. डॉ. पायलला न्याय मिळवून देण्यासाठी ते तिथे आले होते. मात्र, त्यांना आलेले अनुभव ते कॅमे-यासमोर बोलायला सांगितल्यावर नकार देत होते. अखेर दोन-तीन लोकं तयार झाले. एका मुलाची बाईट झाल्यानंतर मुलांच्या शिक्षिका तिथे आल्या. माझी बाईट का घेत नाही, असे विचारू लागल्या. त्या कुठल्यातरी संघटनेच्या कुणीतही असल्याचे सांगितले. शिवाय ही मुलं त्यांनीच आणल्याचे सांगितले. त्यामुळे आधी माझी बाईट कशी गरजेची आहे हे त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांचा फोर्स बघता अखेर आधी ज्युनिअर आणि नंतर सिनिअर असे सांगितल्याने त्या तिथून निघून गेल्या. काही वेळाने त्या माईकवर बोलताना दिसल्या. एक दीड तासांत भाषणाचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर कॅन्डलमार्च काढण्यात आला.

सुमारे दोनशे लोक त्यात होते. कॅन्डल घेऊन शांततेत मार्च संपला. स्टोरी लाईन क्लिअर झाल्याने मार्चनंतर काही लोक आणि विद्यार्थ्यांना भेटायचं ठरवलं. मेडिकल कॉलेजच्या टीचर (बाईट घ्या वाल्या मॅडम) ज्या कुठल्या तरी संघटनेच्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना कसा त्रास होतो. याच्या गोष्टी सांगत होत्या. एक आदिवासी विद्यार्थी संघटनेचे डॉक्टर हा विषय कसा गंभीर असून आम्हाला कॉलेजमध्ये जातीभेद, भेदभाव या विषयी कसे लढावे लागते यावर बराच वेळ बोलले. आदिवासी विद्यार्थ्याने आम्ही होस्टेलमध्ये राहतो. आम्हाला फुकटे असल्याचे टोमणे नेहमी ऐकावे लागत असल्याचे सांगितले. बुद्धिस्ट विद्यार्थ्याने आम्हाला आता टोमण्याची सवय झाल्याचं सांगितलं. पाच-सहा विद्यार्थी आणि टीचरचे नंबर घेतल्यानंतर आम्ही घरी परतलो.

स्टोरीसाठी दुस-या दिवशी विद्यार्थी, शिक्षक आणि संघटनेच्या पदाधिका-यांना आणखी एकदा भेटण्याचं ठरवलं. त्याच रात्री त्यांना कॉल केला. तर विद्यार्थी बोलला की, कॉलेजमध्ये असा कोणताही जातीभेद नाही. टीचरला कॉल केला तर त्या म्हणाल्या की, आम्ही असल्याने भेदभाव वगैरेचा काही चान्सच नाही. संघटनेचे अध्यक्ष बोलले की, तो दुसरा प्रकार आहे. विद्यार्थ्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही. पाच ते सहा फोन केले सर्वांकडून एकच उत्तर मिळाले. कार्यक्रमस्थळी बोलणारे तेच लोक एका तासातच पूर्णपणे बदलले होते. हे सर्व धक्कादायक होतं. त्यामुळे जिथे कोणता भेदभावच नाही आणि ते कॉलेजशी जुळलेले एससी-एसटी विद्यार्थी, टीचर आणि संघटनेचे लोक बोलत असल्याने स्टोरी तिथेच संपली होती त्यामुळे स्टोरी न करण्याचं ठरवलं.

मोबाईलवर मुलांच्या घेतलेल्या बाईट पुन्हा एकदा ऐकत होतो. तेव्हा अचानक नागपूरमध्ये आज 49 डीग्री तापमान असल्याचा मॅसेज आला. हे तापमान येत्या दोन तीन दिवसात 55 डीग्रीपर्यंत जाईल असा इशाराही त्यात दिला होता. मॅसेज वाचून मला घाम फुटला. त्यामुळे कुलरची बटन ऑन करून झोपण्याचा निर्णय घेतला.

Updated : 29 May 2019 7:54 PM IST
Next Story
Share it
Top