विकृतांचे स्पर्श
X
‘मी टू’ या महिलांनी छेडलेल्या आंदोलनातून आज त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टी पुढे येत आहेत. अनेकींच्या मनात इतकी वर्ष दडून बसलेल्या घटनांना, अत्याचारांना वाचा फुटते आहे. कित्येकींना या चळवळीमुळे दिलासा मिळालाय तर काहीजण याचा गैरफायदाही उठवत आहेत. आपण निर्भीडपणे बोलतं व्हावं ही भावना खूपजणींच्या मनात आज प्रबळ होताना दिसतेय. अर्थात वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी अशा महिलांचा वापरही केला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त झालेल्या अन्यायाविषयी बोलणं या हेतूपलीकडे जाऊन देखील या चळवळीची विविध रूपं दिसत आहेत. मुळात झालेली गोष्ट अन्याय किंवा अत्याचार होती याची जाणीव कित्येकींना ‘मी टू’ वर आधारीत बातम्यांमुळे होतेय. कायद्याने लैंगिक अन्यायाच्या प्रकारांमध्ये काय समाविष्ट केलंय हे अनेक महिलांना समजतंय. मुळात आपल्याकडे सर्वच समाजांमध्ये स्त्रियांना बोलण्याची संधी मिळतेच असं नाही, अशा परिस्थितीत त्यांनी उघडपणे अत्याचाराची गोष्ट बोलून दाखवणं म्हणजे कहरच झाला. अन्यायाच्या जाणीवेचं, सलत्या दु:खाचं हे शेअरिंग नावीन्यपूर्ण आहे, लाखो महिलांसाठी ते गरजेचं आहे आणि त्यांना सकारात्मक बळ देणारं आहे. आता गरज फक्त ख-या शोषितांनी बोलण्याची आहे. शोषित म्हटलं तर तुमच्या-आमच्या आई-बहिणीपैकी देखील कोणीही असू शकतं. स्त्रियांचं शोषण नजरेने देखील होतं. रोजच्या जीवनात बायका अनेकाविध प्रकारे लैंगिक शोषणाला किंवा त्रासाला बळी जात असतात. कधी त्यांना याची जाणीव होते तर कधी नाही. स्त्रीच्या जवळ जाऊन तिला त्रास देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी काय काय करतात पुरूष...वाचा..तुम्हालाही कदाचित नवल वाटेल..
- · रस्त्याने चालताना महिलेच्या कानापाशी गाणं गुणगुणणं किंवा हॅलो जानेमन, हॅलो डार्लिंगसारखे शब्द बोलून पटकन निसटून जाणं.
- स्त्रीच्या जवळून जाताना तिला मुद्दामहून खेटून चालणं.
- मुद्दामहून दिसलंच नाही असं दाखवून धक्का मारणं.
- जवळून चालताना तिच्या अंगाला स्पर्श करणं.
- महिलेच्या उघड्या अंगावर किंवा तिच्या पर्सला वीर्य चोळणं.
- महिला जात असताना तिच्यासंबंधी मोठ्याने कमेंट करणं.
- रेल्वे लोकल किंवा बसमध्ये आपल्याहून कमी उंचीच्या महिलेवर झुकून उभं राहाणं.
- बस किंवा रेल्वेच्या गर्दीत अंगाला हात लावणं.
- रेल्वे किंवा मेट्रोत महिलेसमोर मुद्दामहून पाय गरजेपेक्षा जास्त फाकून बसणं.
- सार्वजनिक ठिकाणी महिलेसमोर हस्तमैथुन करणं.
- स्त्री समोर असताना अश्लील अंगविक्षेप करणं.
- महिला समोर बसलेली असताना तिच्या समोर मोबाईलवर मोठ्या आवाजात मुद्दामहून लैंगिक भावना चाळवणारी गाणी ऐकणं किंवा स्वत: गुणगुणणं.
- बस किंवा रेल्वेत महिलेने जे हॅंडल पकडलं असेल तेच हँडल मुद्दाम पकडून स्पर्श करण्याची संधी घेणं.
- स्त्रीला घाबरवण्यासाठी तिचा पाठलाग करणं.
अर्थात तुम्ही या गोष्टी करण्याचा बिलकुलही प्रयत्न करू नका कारण महिलेला त्रास देण्याच्या हेतूने केलेल्या गैरवर्तनांसाठी त्या महिलेने तक्रार केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत आरोपीला कारावास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.