शाळेचा डबा...

शाळेचा डबा...
X

१. काही मुलांना पोळीला भाजी लावून खायचा कंटाळा असतो आणि म्हणूनडच पोळी-भाजी ऐवजी पोळी-भाजीचा रोल द्यावा.

२. अगदी लहान मुलांना चपातीचे तुकडे करता येत नाहीत किंवा तुकडे करून चपाती खाण्यात फार वेळ लागतो आणि मग सुट्टी संपली तरी डबा तसाच राहतो. म्हणून मुलांना पोळीचे छोटे छोटे तुकडे करून द्यावेत.

३. कधीतरी भाजी बिघडली किंवा करपली किंवा घरात दुसरं काहीच नाहीये, आणि घाई पण आहे, दुसरं काही नवीन बनवायला वेळ नाही अश्या वेळी जाडसर चपाती लाटून त्यावर थोडस तेल, मसाला/मिरची पूड, मीठ, तीळ, ओवा किंवा कसुरी मेथी पसरवुन त्याची पुन्हा घडी घालून पोळी लाटावी. अशी हि झटपट मसाला चपाती दही, केचप किंवा लोणच्यासोबत छान लागते. अश्याच प्रकारे मुलांना आवडत असेल तर चटणी किंव्हा मेतकुट घालून झटपट पराठाही बनावता येतो. शिवाय फ्रिजमध्ये उकडलेला बटाटा असेल तर तो किसून घेऊन काही जिरे-धने पूड, मिरची पूड घालून झटपट आलू पराठा तसेच बटाटा+चीज+चिलीफ्लेक्स झटपट चीज पराठा करता येतो.

४. रस्सेदार, तेलकट आणि खूप तिखट भाज्या मुलांना डब्यात अजिबात देऊ नये. लहान मुलांना मिरची काढून घेऊन भाजी द्यावी, सगळं लक्ष खेळण्यात असल्यामुळे मिरची तोंडात जाऊ शकते.

५. दप्तरात डब्याच्या कप्प्यात एक छोटा नॅपकिन ठेवावा.

६. एकदम घट्ट झाकणाचे किंवा उघडायला जड असे डबे देऊ नये.

७. रोज घरी आल्यावर डबा सगळा संपवलास का? भाजी आवडली का? मित्र/मैत्रिणीने काय आणलं होत? आज काय मजा केलीस डबा खाताना? असे प्रश्न हसत हसत विचारावे. मग मुलंही त्यावर आपल्याशी बोलतात. यामुळे आपल्याला पण अंदाज येतो मुलं डब्यामुळे खुश आहेत कि नाही. किंवा डबा खाताना काही अडचणी तर येत नाहीत ना. काय खाल्ल्यामुळे किंवा कशाच्या वासामुळे त्रास होतो, कारण घरी खाल्लेली भाजीचा वास आणि चव तीच असू शकते असं नाही. काय पदार्थ दिला तर वेगळा लागतो. अश्या बऱ्याच गोष्टींचा अंदाज येतो. त्यावरून डब्यात काय द्यावं आणि काय देऊ नये हे ठरवता येत. मोठी मुलं ह्या गोष्टी स्वतःहून सांगू शकतात पण लहान मुलं विचारल्याशिवाय सांगत नाहीत.

८. मुलांचं दप्तर पण रोज तपासावं. काही मुलं न आवडणारे पदार्थ दप्तरात टाकतात शिवाय इतर कचराही असतोच.

लघू मधल्या सुट्टीसाठी किंवा पूर्वप्राथमिक शाळा कमी वेळच्या असतात त्यासाठी काही पर्याय सुचवत आहे :

१. खजूर, सुका मेवा ओट्स, बीट, मटार, गाजर वैगरे पदार्थ वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून ठेवल्यास त्याही डब्यात पूरक अन्न म्हणून देता येतील. त्यात साखरेऐवजी गूळ घातल्यास मुलांना अजून ऊर्जा मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या पण मुलांसाठी उत्तम.

२. उकडलेले शेंगदाणे/हरभरे/मोडाचे मूग, टोमॅटो, कांदा, लिम्बुरस, जीरेपूड किंवा मिरीपूड एकत्र करा, हव तर त्यात कॉर्न फ्लेक्स टाका. सैंधव/मीठ वेगळे द्या किंवा देऊच नका. कडधान्ये उकडताना मीठ टाकले तर ती नंतर मीठाशिवायही खाता येतात. कॉर्न फ्लेक्स पण वेगळ्या डबीत द्या. टोमॅटोच्या बिया काढून टाका, सँडविचमध्येही बीयाविरहित टोमॅटो द्या. काकडी पण खूप पाणीदार असेल तर त्याच्याही बिया काढून टाका.

३. सँडविच आणि मोमो हे डब्याला दिले कि मुलांना मजा आणतात. सँडविच मध्ये अक्षरशः वाटेल ते घालता येते. तसेच मोमोच्या आत आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांचं फिलिंग करता येतं. पालक पनीर, छोले, उसळी याचे मोमोज तयार करता येतात. फक्त मोमो मैद्याचे न बनवता गहू, तांदूळ+नाचणी चे बनवावे आणि शक्यतो उकडलेलेच द्यावे. करंजीच्या साच्यानं आपण मोमो करू शकतो. तांदूळ+नाचणी पीठाचे बनवायचे असतील तर मोदकासारखी उकड काढावी आणि फूडप्रोसेसरमध्ये छान मऊसर मळून घ्यावे.

४. पोळीचे चतकोर तुकडे करून त्यावर भाजी पसरून, वरून चीज किसून घालावं. ही पोळी ओव्हनमध्ये बेक करावी किंवा तव्यावर झाकून चीज वितळेपर्यंत ठेवावी. असा पोळी पिझ्झा मुलांना नक्की आवडेल.

५. हेल्दी स्टफ चिला- चिला बनवण्यासाठी बेसन+कणिक+बारीक रवा, मिरची-आले-लसुन-जिरे याचे वाटण, हळद, मीठ सर्व एकत्र करून ताकात अर्धा तास भिजत ठेवा. नंतर त्याचे पोळे करून घ्या. स्टफिंग बनवण्यासाठी- मोड आलेले मुग, काकडी,टोमाटो, कांदा, चाट मसाला, मीठ टाकून एकत्र करा. तयार पोळ्यावर मेयोनीज पसरवा. त्यावर स्टफिंग पसरवा. टोमाटो केचप सोबत देऊ शकता.

६. छोटे उत्तपे मुलांना आकर्षित करतात. न्याहारी आणि मुलांच्या डब्याला उत्तम. वरून नुसता कांदा घालण्या ऐवजी गाजर, बीट, कोबी किंव्हा पालक या सारख्या भाज्या किसून किंव्हा बारीक चिरून घालू शकता.

७. इडली तर आपण नेहमीच खातो, पण त्यात गाजर, पालक, बीट, मटार या सारख्या भाज्या टाकल्या तर ती अजून पौष्टिक होईलच शिवाय चवीत बदल पण होईल. चटण्याही वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतील. डोसे/उत्तपे करताना सुद्धा वेगवेगळी पीठे आणि भाज्या वापरून वैविधता आणता येईल.

८. उकडलेली कंदमुळं जसे रताळं, अळकुडी, कणकं सुद्धा सोलुन देता येतील.

९. एका लहानशा डबीत चार पाच मनुके, एखादा बदाम, एक काजू, एक लहानसा अक्रोड, खारकांचे तुकडे किंवा सीडलेस खजुर किंवा एखाद अंजीर द्यावे. अगदी भाजलेले शेंगदाणे किंवा चणे पण उत्तम सोबत नैसर्गिक गुळ म्हणजे मूल्यवृध्दीच.

१०. कुरमुऱ्याचा चिवडा किंवा शेव-पोहे पण मुलांना आवडतात.

११. उन्हाळ्यात मुलांना पाण्याच्या दोन बाटल्या द्याव्या लागतात. त्याऐवजी कधीतरी एकात लिंबाचं/कोकमाचं /आवळ्याचं सरबत किंवा ग्लुकॉन-डी टाकून पाणी द्यावं. पन्ह सुद्धा द्यायला हरकत नाही.

१२. वेगवेगळ्या भाज्यांचे कटलेट सुद्धा मुलांना फार आवडतात. सोबत ब्राऊन ब्रेडची स्लाइस दिली तर पूर्ण आहार होईल. सोबत कधीतरी एखादी चीज स्लाइस देखील चालेल.

१३. वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक कुकीज देता येतील.

१४. शाळेत पास्ता/नुडल्स द्यायची परवानगी असेल तर गव्हाचा पास्ता मिळतो तो आणावा. वेगवेगळ्या भाज्या घालून पास्ता/नुडल्स करता येतील.

१५. शाळेत चालत असेल तर उकडलेले अंड देता येईल.

असे असंख्य पर्याय आहेत. जेवढे आठवले तेवढे लिहिले. सुचेल तशी भर घालत राहीन.

Updated : 10 Sept 2018 3:36 PM IST
Next Story
Share it
Top