२०२२ पर्यंत पात्र लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे - पंकजा मुंडे
X
शुक्रवारी १९ आॅक्टोबर रोजी शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप झाला. यावेळी अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या चावीचे वितरण आणि राज्यातील इतर लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी भाषण दिले. त्या म्हणाल्या की, “प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याला मिळालेल्या साडेचार लाख घरकुलांपैकी अडीच लाख घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. या घरकुलांसाठी ३ हजार ४७२ कोटी खर्च करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना रोहयो अंतर्गत ९० दिवसाचा रोजगार, सौभाग्य योजनेअंतर्गत वीज कनेक्शन आणि उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येते. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे धोरणाअंतर्गत राज्यातील १० लाख ५१ हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे देण्यात येणार आहेत.”