‘त्या' निर्भयाची ६ वर्ष पूर्ण…
X
आज १६ डिसेंबर… अंगावर थरकाप उडणारी दिल्लीतल्या त्या निर्भयाची दुर्देवी घटना… या घटनेमुळे देशच नाही तर जगही हादरून गेला होता. निर्भयाच्या या हत्याकांडविरोधात देशभरातला जनसमुदाय रस्त्यावर उतरला आणि हे कृत्य करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्यास भाग पाडले. या घटनेला आज सहा वर्ष पूर्ण जरी झाली असली तरी परिस्थिती आज जैसे थे आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात स्पष्ट झाले. २०१२- २०१७ या कालावधीत महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण ९६ टक्क्यांनी वाढले असून अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण ७२टक्के असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला.
२०१६ मध्ये नोंदविण्यात आलेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण ७२ टक्के होते. २०१६मध्ये बलात्काराचे ६२८ गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यातील ४५५ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आहेत. २०१२ ते २०१७ या कालावधीत महिला छेडछाडीच्या प्रकरणांत तब्बल १६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
६ वर्षानंतरही परिस्थिती फार काही बदलेली नाही. दिल्लीतल्या त्या निर्भयाची ६ वर्ष जरी पूर्ण झाली असली तरी देशातल्या अनेक निर्भया न्यायालयाच्या दारात आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात न्याय मिळावा अशा प्रतिक्षेत आहेत. महिलांवरील अत्याचार या कायद्यात जरी बदल झाला असला तरी अंमलबजावणीची प्रक्रिया महत्त्वाची आहे.