नवीन युग...

नवीन युग...
X

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी हे धाडसी विधान करताना मोह आवरत नाहीय, पण मला खूप आतून वाटतंय की, हे नवीन युग महिलांचं असेल. विविध क्षेत्रातील महिला नेतृत्व या युगामध्ये सर्वच क्षेत्रांवर आपला प्रभाव सिद्ध करतील, राज्य करतील. संपूर्ण जगाने उजवे-डावे, उदारमतवादी, अतीउजवे-अतीडावे आणि अतिउदारमतवादी राजकारण जवळून अनुभवलं आहे. या सर्व प्रवाहांमध्ये सारासार, विवेकी विचार जगवणं कठीण होऊन बसलंय. एकतर तुम्ही हे असा किंवा ते, हे बोला किंवा ते, असं करा किंवा तसं.. सगळंच साच्यात बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या हे आणि ते, असं आणि तसं याच्या पलिकडे पण माणूस म्हणून माझा काही विचार आहे, तो मान्य केला गेला पाहिजे. माझ्या मतांचा आदर करणारी विचारधारा मला हवीय, मला माझे विचार मांडता येईल असं वातावरण मला हवंय, मला हवं ते बोलता यायला हवं.. या माझ्या कमीतकमी मागण्या आहेत. त्या पूर्ण करेल अशी कुठलीच विचारधारा मला सध्या दिसत नाहीय.

अशा वेळी जगामध्ये या सर्व अतीकरणातून एक वेगळा प्रवाह तयार होईल. तो प्रवाह नेमका कसा असेल मला माहित नाही, पण मला गेली अनेक वर्षे असं वाटत आलंय की जगभरात महिलांचं नेतृत्वच ही कोंडी फोडू शकेल. मी अनेकांकडे माझे हे विचार बोलून दाखवलेयत. काहींनी हसण्यावारी नेलेयत, काहींना उगीचच डीप थॉट वगैरे वाटतोय बहुधा त्यांना मला दुखवायचं नसेल. काहींना प्रामाणिकपणे माझी ही भावना समजलीय.

पृथ्वीच्या निर्मितीपासूनचा इतिहास पाहिला तर तो बहुतांश पुरुषांचाच इतिहास आहे, त्यामुळे पृथ्वीच्या आताच्या वाताहतीसाठी मी पुरुषांनाच 99 टक्के जबाबदार मानतो. यातून बाहेर पडायचं असेल तर महिलांनी काही काळ पृथ्वीचं नेतृत्व करायला पाहिजे. कदाचित पृथ्वीच्या इतिहासात महिलांनी नेतृत्व केल्याचा इतिहास जाणीवपूर्वक पुसून ही टाकलेला असू शकतो. तो शोधून काढला पाहिजे अशी काही माझी इच्छा नाही. इतिहासाचा खूप आग्रह धरणारा मी माणूस नाहीय, तसं वागणं गुन्हेगारी स्वरूपाचं असतं असं माझं मानणं आहे. त्या त्या वेळेला जे जे योग्य किंवा अयोग्य वाटलं ते-ते इतिहास'पुरुषांनी' त्यांच्या त्यांच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे केलं आहे, त्याला आजची परिमाणं लावून सतत वाद घालत बसलेली माणसं मला कधीच आवडत नाहीत. तरी सुद्धा महिलांचा काही तरी स्वतंत्र इतिहास असावा, मधल्या कुठल्यातरी काळात जगात महिलांचं नेतृत्व असावं असं मला नेहमी वाटत आलंय.

मला जे वाटतंय, त्याचाच धागा पकडून आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला सतत वाटत आलंय. म्हणून मॅक्समहाराष्ट्र मधील सर्व महिला सहकाऱ्यांना मी विनंती केली होती की तुम्ही एकत्र येऊन मॅक्सवुमन नावाने केवळ महिलांसाठी एखादं पोर्टल काढा, त्यात प्रामुख्याने नटणं-सजणं, जेवण बनवणे यापलिकडच्या विषयांवर चर्चा असेल. मुख्यप्रवाहात महिलांचं स्वतंत्र माध्यम निर्माण व्हायला हवं, आणि ते आक्रमक ही असलं पाहिजे.

यातूनच आता मॅक्सवुमन साकारतंय. उभं राहतंय. मॅक्सवुमन हे खुलं प्लॅटफॉर्म असणार आहे, सर्वांसाठी खुलं.. याच महिन्यात मॅक्सवुमनच्या पोर्टलचं लाँचींग होईल. याबाबतची पुढची घोषणा लवकरच...

- रवींद्र आंबेकर

Updated : 3 Jan 2019 12:34 PM IST
Next Story
Share it
Top