#Me too वादळ...
X
“केवळ बदल हेच एकमेव शाश्वत आहे” असे म्हटले जाते. याचा प्रत्यय देखील आपल्याला अनेकदा येतो. मात्र स्त्री प्रश्नांविषयी हे कितपत म्हणता येईल याबद्दल जरा शंकाच वाटते. गेली कित्येक वर्ष ज्या गोष्टीमुळे स्त्रीला मानसिक त्रासाला आणि शोषणाला बळी पडावे लागते तो प्रश्न आहे, हेच मुळी समाजाला मान्य असूनही लोकांनी त्याकडे कानाडोळा केला कि काय असे वाटते. लैंगिक छळवणूक, विनयभंग अथवा छेडछाड अशा नावाखाली अनेकदा गून्हे म्हणून त्याकडे पाहिलेच गेले नाही. मात्र याचा त्रास कश्याप्रकारे महिलांना होतो हे समोर आले आहे ते सोशल मिडीयाच्या माध्यमातुन.
सोशल मिडीयावर काहीकाळात #me too हि मोहीम जोरदार चालली. सोशल मिडीया तुमच्या मनातील भाव - भावना मांडण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे. अनेकदा कोंडलेल्या भावनांना इथे वाट करुन दिली जाते आणि त्या भावनांची पुढे मोहिमच होते हे स्पष्ट झाले आहे. पून्हा एकदा हि स्पष्टता येण्यासाठी #Me too हि सोशल मिडीयातील मोहीम कारणीभुत ठरली आहे. हॅालीवूड प्रोड्यूसर हारे वेनिन्सटेन (Harey weinstein) यांच्या विरोधात काही महीला पत्रकारांनी पूढाकार घेउन लैंगिक छळवणूकीची तक्रार दाखल केली. त्यांना पाठिंबा म्हणुन प्रसिद्ध अभिनेत्री (Alyssa Milan) अलिसा मिलेन हीने १६ आँक्टोबर रोजी ट्विटर हॅन्डल वरुन व्टिट केले व ज्या महिला लैंगिक छळवणूकीच्या बळी आहेत त्यांनी आपल्या व्यथा #me too असे लिहून प्रसारीत कराव्यात असे आवाहन तिने केले. तिच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत महिलांनी व पुरुषांनीही स्वत; वर झालेल्या लैंगिक छळाबद्दलच्या व्यथा मांडल्या. ६८००० लोकांनी मिलेन यांच्या व्टिटरला उत्तर दिले तर एक मिनीटाच्या आत हा हॅश टॅग फ्रान्स, युरोप, पाकिस्तान , भारतासह आशियाई देशाबरोबरच अखाती देशातही पोहचला.
केवळ एका प्रकरणाच्या पाठिंब्यासाठी केलेले हे आवाहन जगाच्या काना-कोपऱ्यात तर पोहचलेच मात्र लैंगिक छळवणूकीबाबत me too या दोन शब्दांनी महिलांना आधार दिला व आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द बोलण्याची ताकद दिली. इतर वेळेस अगदी आपल्या जवळच्या लोकांकडे लैंगिक छळवणूकीची वाच्यता करायला महिला घाबरतात अशा परिस्थीतीत #Me too च्या मोहीमेचे कौतूकच आहे. हि मोहिम व्टिटरवर सुरु झाली असली तरी फेसबूक, इन्साटाग्राम ,स्नॅप चॅट या प्रकारच्या सर्व सोशल मिडीयावर ती पसरली इतकेच नव्हे तर फ्रेन्चमध्ये (balancetonporc) स्पॅनिशमध्ये #yoTambine तसेच आखाती देशांमध्ये तेथील प्रचलित भाषेत तो हॅश टॅग वापरला गेला. जवळपास एक मिलीयन वेळा #me too हा हॅश टॅग वापरला गेला असून फेसबूकच्या रिपोर्ट नूसार ४.७ मिलीयन लोक २४ तासात #me too यावर बोलते होते. अभिनेत्रीने तयार केलेल्या या सोशल मिडीया मोहिमेला हॅालिवूडमधील अभिनेत्यांनीही पाठींबा दर्शवत आपल्या व्यथा मांडल्या, त्याबरोबरच राजकीय महिला प्रतिनिधी, ॲालंपिक खेळाडू याही आपल्या व्यथा मांडण्यात मागे राहील्या नाहीत. Vir das,shreyl crow,kimya Dawson,Lady Gaya यांसह असंख्य सेलिब्रिटिने या हॅशटॅगचा वापर केला.
भारतात कोकणा सेन, कंगना राउत, राधिका आपटे, कनडा अभिनेत्री नितू शेट्टी, बरोबरीने तनूश्री दत्ता #metoo या मोहिमेत उडी घेतली. अंगावर काटा आणणा-या सत्य घटना अनेक महिलांनी व्यक्त केल्या. ग्लोबल टू लोकल असा या मोहिमेचा प्रवास झाला.
लंडनमधील नवाज म्हणते की “ लैंगिक छळवणूकीसाठी मलाच जबाबदार धरलं गेले, याबद्दल कूठेही भाष्य न करण्यासाठीच मला उद्युक्त करण्यात आले” हैद्राबादची मिशेल सांगते “अकरा वर्षांची असताना माझ्याच चूलत भावाने मला बेडवर खेचले आणि तू हे केलच पाहिजे माझ्यासाठी कारण मी सांगतोय ते तू ऐकलचं पाहिजे कारण तू मूलगी आहेस”. फ्रान्समधील केली म्हणते “ कित्येक वर्षापासून मी ओरडून सांगत होते. पण मी सांगितलेले कोणाला ऐकायचे नव्हते” जेस्टर तर म्हणतो “१४ वर्षाचा असताना माझ्यावर बलात्कार झाला पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवला नाही कारण मी मूलगा होतो आणि बलात्कार करणारी बाई होती” क्रिस्टन सांगते “ मी जेव्हा बलात्कारा बद्दल तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा तक्रार दाखल करताना पोलीस महिला म्हणाली तक्रार दाखल न करणचं जास्त योग्य” ऐश्वर्या सांगते की “ माझा मोठा भाऊ दारु पिऊन आला आणि माझ्यावर बलात्कार केला” लिव्ही सांगते “ मी सहा वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला ती माझीच चुक असल्याच मला वाटत होते.” अशा एक न दोन असंख्य कहाण्या काही जवळचे नातेवाईक कधी मित्र तर कधी शेजारी.
या सगळ्या व्यथा ऐकल्या की प्रत्येक महिलेने कधी ना कधी लैंगिक छळवणूक कुठल्या ना कुठल्या स्वरुपात सहन केलेली आहे हे लक्षात येते यावरुनच लैंगिक छळाचे प्रमाण किती मोठ्या संखेने आहे हे कळून येते. या मोहिमेची विशेष बाब म्हणजे अनेक पुरुषांनी लैंगिक छळाच्याविरुध्द उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जेस म्हणतो “या कहाण्या वाचण्या आधी या सगळ्या त्रासाची मी कल्पना ही करु शकत नव्हतो.अॅन डे म्हणतो “ मागे वळून बघताना मी केलेल्या कृत्याचा इतका त्रास होतो हे वाचून मला स्वत ची लाज वाटते. पुरुषांनी बदलले पाहीजे” खरतर याविषयी वाच्यताही करु नये असे अनेकदा मूलीला सुचवले जात, त्यात जर ती व्यक्ती उच्चपदस्थ असेल तर मग बोलायलाच नको गळीमिळी गुपचिळीच बरी असाच काहीसा दृष्टीकोन घरच्यांचा महिलांविषयी असतो. एक पिढी तर हे अन्याय आपण बाई आहोत तर सहन करावेच लागतील या विचारात वाढली. त्या पिढीशी बोलले कि कळते त्यांना सांगायचे खुप होते मात्र कोणी ऐकणारेच नव्हते. मी टू मध्ये सांगणारे ,ऐकणारे, सांत्वन करणारे सगळेच गोळा झाले. स्रियांच्या लैंगिक छळवणू्कीचा प्रश्न हा कधीच त्यांचा राहत नसे कधी तो कुटुंबाचा तर कधी जातीय अस्मितेचा मुद्दा होत अथवा अगदिच दुर्लक्षिलेला. कोणी छेड काढलीच तर आई आपल्या मूलीला तो रस्ता चुकवून दुस-या रस्त्याने जा असे सांगते. छेडछाड हा गुन्हा आहे असे त्याकडे केव्हाच पाहीले गेले नाही. तरुण मूले सार्वजनिक ठिकाणी ओंगळवाणे स्पर्श करताना दिसले तरी फारसे कोणी जाहिर आक्षेप घेताना आपल्या दिसत नाही. स्त्री चळवळीने जरी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला तरी हे स्त्रीयांचे प्रश्न आहेत आमचा याच्याशी संबंध नाही, असाच पुरुषांचा दृष्टीकोन असतो. मी टू च्या सोशल मिडीया मोहिमेत मात्र असे होताना दिसत नाही. अर्थात स्त्रीयांच्या विरुध्दही यात अनेक पुरुष बोलले असले तरी किमान यावर अनेक पुरुष व्यक्त झाले. “आम्हाला याचे काय” असे झाले नाही... हे अतिशय महत्वाचे. या बरोबरच एक अतिशय चांगली गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे स्त्रीयांनी दिलेल्या त्रासाचाही या मोहिमेत उल्लेख झाला याबरोबरच समलिंगी त्रासाबद्दलही बोलले गेले. कुठल्याही लिंगाच्या व्यक्तीला प्राधान्य न देता केवळ अत्याचार ग्रस्त म्हणून मोहिमेत सहभागी होता आले. अशी बहूदा पहिलीच मोहिम असावी काही महिलांच्या समर्थनार्थ बोलले गेले कि पुरुषांना ते आपल्या विरोधात आहे असे वाटते तर पुरुषांच्या समर्थनात काही बोलले कि स्त्रीयांना आपल्या विरोधात हे आहे असे वाटते. मी टू ने मात्र तृतियपंथीना देखील सामावून घेतले. जगातील सर्वांना सामावुन घेतलेली अशी ही पहिलीच चळवळ असावी. प्रश्न तेच मात्र स्वरुप बदलाची ही नांदी असावी.
जगभर गाजणाऱ्या #Me too या हॅश टॅगचा वापर जरी मिलन या अभिनेत्रीने केला असला तरी या शब्दांचा उगम मात्र २००६ मध्ये सामाजीक कार्यकर्त्या Tarana Burek यांच्या मार्फत झाला आहे. १३ वर्षीय एका मुलीवर बलात्कार झाल्याचे जेव्हा त्या मुलीने Burek यांना सांगीतले तेव्हा त्या तिला मदत करु शकल्या नाही. मी तुझ्या दुखात सहभागी आहे व मी ही या प्रसंगातून गेली आहे, त्यामूळे या प्रसंगात होणाऱ्या वेदना व दु ख याची मला अनूभुती आहे हे सांगण्यासाठी त्यांनी केवळ Me too या शब्दाचा प्रयोग केला. त्यानंतर बलात्कार तसेच लैंगिक छळवणूकीला सामोरे गेलेल्या महिलांसाठी त्यांनी संस्था सुरु केली व सोशल मिडीयावर #Metoo हि मोहीम सुरु केली. याच मोहिमेला मिलेन हिने पूढे नेत ती जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवली. आपल्या फेसबुक वॅालवर या हॅश टॅग खाली वाहणाऱ्या पोस्टच्या पूराबद्दल बोलताना राजकिय प्रतिनिधी Mhairar Black म्हणाल्या “ महिलांच्या इतक्या धक्कादायक कथा वाचून मोठा धक्काच बसतो आहे. प्रत्येक वयातील बाईची कहाणी वेगळी जरी असली तरी त्याकडे ती एक घटना म्हणून बघता कामा नये. खूपदा तो एक वाईट प्रवृत्तीचा पुरुष म्हणुन बघितले जात मात्र आता या सगळ्या घटना वाचताना तो एकच पुरुष नसुन हि एक वृत्तीच आहे हे अधिकरीत्या स्पष्ट होते. या निमित्ताने महिला बोलत्या होत आहेत ते कौतुकास्पद आहे.
या हॅश टॅगचा केवळ बुडुबडा आहे असे नाही तर त्याचा परिणामही आपल्याला बघायला मिळतो आहे. पत्रकार सॅम क्रिस यांच्या विरोधात जबरदस्तीने अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कर एका महिलेने #Metoo वापरला. त्यावर माफी मागत सॅमने पोस्ट केली असली तरी त्यांचे लायलन्स जपतीच्या मार्गावर आहे याबरोबरच Rupert Myers ,Lockhart steel यांच्यवरही याच हॅशटॅग खाली केलेल्या तक्रारीतुन कारवाइ करण्यात आली आहे. ज्या प्रकरणामुळे #Metoo ची हवा वाहण्यास सुरवात झाली त्यातील होलिवुड प्रोडुसर हारे वेनिन्सटेन (Harey weinstein) यांच्या विरोधात तब्बल साठ जणींनी तक्रार केली व त्यामुळे कंपनीने कारवाई करत हारे यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या बरोबरच आँस्करच्या पॅनलवरुन हटवण्यात आले आहे. भारतात मात्र अनेक महिलांनी सोशल मिडीया माध्यमातुन मी टू मध्ये सहभाग घेतला असला तरी पोलिसांत जाऊन तक्रार करणे अनेकींनी टाळले आहे. अशा वेळी ही मोहीम पेल्यातील वादळ ठरण्याचा धोका तयार होतो. या मोहिमेत मी ही सामिल आहे तुमचं काय?