लैंगिक जीवन ते अधिकार... महिलांच्या प्रश्नांवर बोलूया
Max Maharashtra | 16 Sept 2019 10:32 PM IST
X
X
महिलांच्या बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या पुरवणीचा विषय असतो. पण या बातम्यांना चर्चेचा मुद्दा बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. याचमुळे महिलांशी संबंधित या बातम्यांवर चर्चा घडवून आणणं मला महत्वाचं वाटतं.
महिलांना फक्त लैंगिक भावना शमवणारी वस्तू असा समज समाजातल्या बहुतांश लोकांमध्ये आहे. महिलांची फार तर पुढची ओळख म्हणजे गृहीणी.. घरात राहणारी, काम करणारी बाई. ती स्वतंत्रपणे जगू लागली, यशस्वी होऊ लागली की, मग तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा बदलतो. पण शेवटी ती बाईच राहते. या सगळ्या दृष्टीकोनांची चर्चा आपल्याला करायची आहे.
बीड मधल्या लंकाबाईचं अवघं जीवन मुलं जन्माला घालण्यात गेलंय. या बाळंतपणात ती जगेल की नाही अशी शंका तिला आहे. तिच्या मुलांपैकी दगावलेल्या मुलांना पोषण मिळालं नाही, मुलांचं संगोपन कसं करायचं याचं ज्ञान तिला मिळायच्या आतच ती आई होत गेली... खरं तर तिचं अस्तित्व केवळ प्रजननक्षम मादी इतकंच राहिलं. अज्ञानामुळे ती एक लैंगिक वस्तू चं आयुष्य जगली. तिच्या पर्यंत देशाची आरोग्य व्यवस्था पोहोचू शकली नाही. लंकाबाईच्या या बातमीने प्रगत समाजाच्या सगळ्या कल्पनांना हादरा दिला आहे. तुमच्या आसपास ही अशा लंकाबाई असू शकतात. अशा लंकाबाईसाठी आवाज उठवा.
दुसरी महत्वाची बातमी सांगली-कोल्हापूर-गडचिरोली इथल्या पुराच्या काळात समोर आली. कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली की ज्या पद्धतीने मदत किंवा बचाव कार्य केलं जातं त्यात महिलांच्या दृष्टीकोनातून सहसा विचार केला जात नाही. अंगावरच्या कपड्यानिशी घरातून बाहेर पडताना एखाद्या पिशवीत संपूर्ण संसार बांधून ती घराबाहेर पडते. अंगावरचं दूध पिणारं बाळ कडेवर असतं. या सगळ्या गदारोळात तिला बाळाला पाजायला जागाच सापडत नाही. लाजेखातर अनेकदा मग बाळाला स्तनपान करण्याएवजी बाहेरचं दूध दिलं जातं. यामुळे बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
त्यामुळे आपत्तीच्या काळात स्तनदा मातांसाठी वेगळ्या कक्षांची व्यवस्था केली गेली पाहिजे. वारी किंवा इतर गर्दीच्या ठिकाणीही अशी व्यवस्था व्हायला हवी. विकासाच्या या गर्दीत ही छोटीशी वाटणारी गोष्ट माणसाच्या एकून जन्म आणि विकासाचा पाया आहे, त्याकडे होणारं दुर्लक्ष थांबवलं पाहिजे.
या बातम्या-कहाण्या छोट्या जरूर असतील पण त्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या आहेत. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा. ज्यावर चर्चा व्हायला पाहिजे असं वाटत असेल असे विषय ही आम्हाला सुचवा.
पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट
Updated : 16 Sept 2019 10:32 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire