Home > मॅक्स वूमन > ‘झेर’ च्या शोधात

‘झेर’ च्या शोधात

‘झेर’ च्या शोधात
X

सोशल मीडियावरून एका अनोळखी मुलीच्या' प्रेमात' पडलेल्या हमीद अन्सारीने बिनापरवाना पाकिस्तानात प्रवेश केला ,तब्बल सहा वर्षे तिथल्या तुरुंगात खितपत पडून तो सुखरूप भारतात परतला ही बातमी नेमकी कालच प्रसारमाध्यमांमधून झळकू लागली .हमीदच्या या वेडेपणामागे नेमकं काय होतं ? ज्या आभासी जगात आजची तरुणाई जगते आहे त्या 'व्हर्च्युअल रियालिटी' चा वास्तवाशी असणारा विसंवाद ? आपल्या देशाशी पिढ्यांपिढ्यांचे शत्रुत्व पत्करलेल्या देशातल्या एका कोपऱ्यात एका अनोळखी मुलीचे मनाविरुद्ध लग्न होणार आहे तिला वाचवायला निघण्याचे धाडस ? स्वतःची सुपरहिरो बनण्याची ,जग जिंकण्याची ऊर्मि ?यात जीव जाणार आहे ,नक्कीच जाणार आहे हे माहित असून सुद्धा ? की अशा अनेक कारणांऐवजी आणखीन काही वेगळं कारण जे कधीच प्रकाशात येणार नाही ? हेसगळे प्रश्न मनात गर्दी करत असताना काल आशियाई चित्रपट महोत्सवात 'झेर 'हा टर्किश चित्रपट बघायला मिळाला . मूळचा टर्किश पण अमेरिकेत वाढलेला तरुण जान 'झेर 'च्या शोधात टर्कीला येण्याचे वेडे धाडस करतो . त्याच्यासारख्या अनेक स्थलांतरितांच्या कुटुंबांसाठी अमेरिका ही आजही एक निवारा ,शिक्षण आणि करिअरच्या संधी देणारी सुरक्षित भूमी आहे ,आता तोच त्यांचा देश ,तिथली माणसे -कुटुंब -मित्र हेच त्यांचे जग . मग ते काय होते त्यामुळे हा मुलगा ते सगळे सुरक्षित जग पाठी सोडून एकटाच झेरच्या शोधात निघाला ?कोण होता -होती झेर,की तो-ती कुठे कधीकाळी नव्हतीच ? की नुसतीच एक दंतकथा होती तुर्की लोकगीतांमधून अमर झालेली ? इराण ,सीरियात अमेरिकेने पेटवलेले युद्ध टर्कीच्या सीमेवर कधीच येऊन उभे राहिले आहे ,पुढची पाळी आपली आहे हे जाणून आहेत ते, म्हणून कुठेतरी आपली जुनी काव्ये ,संगीत ,वाध्ये अशी संस्कृतीची चिन्हे जपून ठेवण्याची धडपड सुरु आहे का जी या चित्रपटातून व्यक्त होते आहे ? त्या टेकड्यात बसलेल्या लहानलहान खेड्यातल्या अक्रोडाच्या झाडांच्या शेंड्यावरून ,तळ्याच्या काठावरून कोण हाक देत होते ?कुणी तिथे तो खुणेचा लाल स्कार्फ बांधून ठेवला होता ?कोणती साद होती होते जी जानला ऐकू आली,ज्या पायी झपाटून जात त्याने घरदार सॊडले आणि तो त्या अनोळखी झेरचा पत्ता शोधत निघाला .कुठे सापडली त्याला झेर, की सापडलीच नाही ? की त्याला स्वतःचा 'स्व' च सापडत गेला ?की हा आहे दिग्दर्शकाच्या आत्मशोधाचा प्रवास ?कदाचित तुमच्या-माझ्यासारख्या या गर्दीने कोंडलेल्या शहरात जगणाऱ्या , आभासी जगात गुदमरत चाललेल्या प्रत्येक 'जिवंत ' राहू पाहणाऱ्या माणसाचाही ! संपणारा की न संपणारा ?

नक्की बघा 'झेर',कदाचित तुम्हालाही काही सापडेल !

Updated : 21 Dec 2018 7:04 PM IST
Next Story
Share it
Top