मी कधीही थकणार नाही, थांबणार नाही आणि कोणासमोर झुकणार नाही - पंकजा मुंडे
X
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे दसरा मेळावा आयोजीत केला होता. त्यांनी आपल्या दसरा मेळाव्यात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी आपल्या भाषणातून अनेकांवर निशाणा साधला. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले.
आपल्या भाषणातून विरोधकांचा समाचार घेताना त्या म्हणाल्या की, "सर्व्हे कोणी केला. इथे जमलेली गर्दी पाहावी. सर्वेक्षणाच्या आधारे तिकीट दिले जात नाही. तर माणसं बघून तिकीट दिले जाते. महाराष्ट्रात २०१९ मध्ये विजयी घंटा वाजणारच. राज्यात आणि देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला. भक्तीचा बाजार मांडणं ही संताची शिकवण नाही, मी कधीही थकणार नाही, थांबणार नाही आणि कोणासमोर झुकणार नाही."
नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यावरुन विरोधक टीका करत आहे. या सरकारी कार्यक्रमावर २ कोटींची उधळपट्टी केल्याचा दावा केला जात होता. यावर त्या म्हणाल्या, "आम्ही करमणुकीचे कार्यक्रम घेत नाही, लाभार्थ्यांना तिथे आणणार असू तर तुमच्या पोटात का दुखतं?, माझ्या विरोधकांना मी इतकंच सांगेन की, तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ, सामने वार कर फिर मुझे आजमा. ऊसतोड कामगार ही व्होट बँक नव्हे तर बँक आहे."
पुढे त्यांनी विरोधकांवर टिका केली. त्या म्हणाल्या की, "वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येईल. लपून वार काय करता, समोरून वार करा असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी केला. तोडपाणी करण्याची कामं आम्ही करत नाही, सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं. आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. उद्याचा दिवस मावळायच्या आत ‘ऊसतोड कामगार महामंडळ’ स्थापन करु."
पुढे त्यांनी जनतेला दिलासा देत त्या म्हणाल्या की, "राजकारणासाठी, मतांसाठी चुकीची तडजोड करणार नाही. आपण स्वाभिमानी आहोत. राजधर्म निभावणं हेच माझं काम आहे. तुमचा विकास करणं हे माझं काम आहे. भविष्यात विकासच सर्व रोगाचे उच्चाटन करणार आहे,गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष केला. दुर्लक्षितांना मोठ्या पदांवर संधी दिली. आता त्यांच्या लेकीची सत्ता आहे म्हणून मायेने तुमच्या पदरात विकासाची ओटी भरायला आली आहे. गोपीनाथ मुंडे हे किंगमेकर होते. आता तुम्ही मला ज्या जागी बसवले तिथे जनतेच्या हिताचं सरकार आणणं हे माझं कर्तव्य आहे. खुर्चीवर बसणं माझं कर्तव्य नाही, मला कोणत्याही पदाची लालसा नाही."