'लिंगनिरपेक्ष भाषा'
Max Maharashtra | 21 Sept 2019 10:24 PM IST
X
X
मराठी भाषा प्राकृत भाषेतून उगम पावली आहे. प्राकृत भाषेत प्राचीन हिंदू संस्कृतीचे पडसाद उमटलेले स्पष्ट दिसतात. तसेच मराठी भाषेतही ते आपसुकच आले आहेत. त्यामुळे भाषाही पुरुषप्रधानतेची व समाजातल्या विषमतेची पिढ्यानपिढ्या भलामण करणारीच घडत राहिली आहे. साधे उदाहरण घेऊ, पती व पत्नी या शब्दांचे. पती म्हणजे स्वामी, मालक. पत्नी ही त्याच्या अधीन म्हणजेच दुय्यम. कुलपती, लखपती, सभापती, गणपती, सेनापती ही अधिकार दर्शवणारी पदे. मग आपण 'नवरा'ऐवजी पती शब्द का वापरतो? त्यातून पुरुष श्रेष्ठ आहे हेच ध्वनित होत नाही का?
आणखी एक मुद्दा असा की आपण मराठी भाषेतून नकळत असमानताच पसरवतो आहोत . उदाहरणार्थ , बहुतेक सर्व अधिकारपदांची नावे पुल्लिंगी आहेत. ती स्त्रीलिंगीच असावीत असे म्हणायचे नाही, तर ती लिंगरहित शब्दांनी तयार झालेली असावीत. इंग्रजीत chairperson हा शब्द प्रचलित झाला आहे, तसे मराठीत का होऊ नये? उदा. संपादक, प्राध्यापक, शिक्षक, लेखक, पत्रक, पालक यांची स्त्रीलिंगी नामे इका प्रत्यय देऊन केलेली आहेत. तशी अभ्यासक, वाचक, याचक यांची केली तर ती हास्यास्पद होतील. आणि मालक, वकील, अध्यक्ष यांचे स्त्रीलिंग खुशाल ईण प्रत्यय लावून केले जाते. सदन - सदनिका , जवन - जवनिका , स्मरण – स्मरणिका.
यावरून भाषेतले स्त्रीलिंग हे नेहमीच कनिष्ठ, छोट्या गोष्टीचे निदर्शक आहे असे आढळते. त्यातून स्त्रीलिंगाचे दुय्यमत्वच ठसवले जाते. हे बदलता येणार नाही का ? हे काम केवळ लिंगनिरपेक्ष शब्द वापरण्यामुळेच होऊ शकते.
समाधान पाटीलचे म्हणणे आहे की, समाज बदलतो तशी भाषा बदलते. जशी नवीन साधने आल्यावर त्यांच्याविषयी नवीन शब्द भाषेत येतात. तसेच ज्या साधनांचा वापर होत नाही. त्यांविषयीचे शब्द मागे पडतात व नंतर लोप पावतात. आता बदलत्या समाजानुसार काही नातेसूचक शब्द तसेच पारंपरिक शेतीविषयीचे शब्द मागे पडताना दिसत आहेत. समाज बदलला की मग हळूहळू भाषा बदलते .
प्रवीण अक्कनवरू म्हणतात, पर्याय जाणीवपूर्वक शोधावे लागतील. मुख्यतः त्यांचा वापर वाढवून ते अंगवळणी पाडावे लागतील. पुरुषी मानसिकतेत मेख दडलेली आहे हे सर्वज्ञात आहेच. उपलब्ध पर्यायांचा सद्यस्थितीत जो वापर होतो त्यावरूनही त्याचे आकलन होऊ शकते. जितका वापर 'विद्वान' या शब्दाचा होतो तितका 'विदुषी' चा होत नाही. 'त्या बाई फार विद्वान आहेत' असे सर्रास बोलले जाते. परंतु याउलट नकारात्मक अर्थ असलेला 'विधवा' ज्या सहजतेने कानावर पडतो, तितका 'विधुर' ऐकण्यात येत नाही. कारण 'नवरा' नसणे ही मोठी गोष्ट आहे आपल्याकडे.
'शास्त्रज्ञ' या शब्दावर पुरुषी ठसा जाणवतो. 'Scientist' सारखा तो लिंगभेदविरहित वाटत नाही. 'महिला शास्त्रज्ञ' असेही वाचण्यात येते. ज्ञान, विद्वत्ता आणि पराक्रमाची पुरुषी मक्तेदारी याचे मूळ असावे. वैयक्तिक पातळीवर प्रयत्न शक्य असले तरी सामूहिक पातळीवर मूलभूत प्रयत्नांची गरज जाणवते. उदा : शैक्षणिक धोरणात लिंगभेदाचा भाषिक पातळीवर विचार करून उपक्रमाधारित अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करणे इत्यादी… आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम दिसण्यासाठी कदाचित काही पिढ्या जाव्या लागतील.
जिथे सृजनाचा संबंध येतो तिथे नामे स्त्रीलिंगी असतात. उदा. धरती, नदी, बुद्धी, प्रज्ञा, प्रतिभा इ. ही एक बाब स्पष्टपणे दिसते. मात्र अनेक असे पुल्लिंगी शब्द वापरात आहेत की त्या शब्दांवरून पुरुषी वर्चस्व, मालकीहक्क , स्त्रीलिंगाला गौणत्व दर्शवले जाते. मुळात सृजनशक्ती हा चमत्कार आहे, नवा जीव व नवं जग घडवण्याची ताकद हा एक वेगळा आविष्कार स्त्रीच्या ठायी आहे. अशा या खुद्द निर्मितीक्षम शक्तीला समाजाने देवता मानण्याऐवजी एक माणूस म्हणून नेहमीच समतेचे स्थान दिले पाहिजे. तसे ते वागणुकीतून व भाषेतून दिसून येत नसेल तर समाज अजूनही बदललेला नाही, आधुनिक झाला नाही असेच म्हणावे लागेल.
यापुढचा मुद्दा आहे तृतीयलिंगी मनुष्यांसंबंधीचा. त्यांनाही एकूणच बरोबरीचे स्थान द्यावयास हवे. लिंगनिरपेक्ष शब्द वापरले तर तो प्रश्नही आपोआपच सुटेल.
Updated : 21 Sept 2019 10:24 PM IST
Tags: gander-based language gender gender-inclusive language gender-neutral language indo-european language language
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire