Home > Election 2020 > Exclusive : देशातील पहिल्या आधारकार्डधारक महिलेचं कार्डचं लिंक नाही

Exclusive : देशातील पहिल्या आधारकार्डधारक महिलेचं कार्डचं लिंक नाही

Exclusive : देशातील पहिल्या आधारकार्डधारक महिलेचं कार्डचं लिंक नाही
X

देशातील पहिलं आधार कार्ड मिळवण्याचा बहुमान महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील टेंभली या गावाला मिळाला. देशातलं पहिलंच आधारकार्ड मिळालं ते टेंभलीच्या रजनी सोनवणे यांना. मात्र, त्यानंतर आता रजनी आणि टेंभली दोघांकडेही यंत्रणेनं सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. मॅक्स महाराष्ट्रनं थेट टेंभली इथं जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतलीय.

सातपुडा पर्वत रांगांच्या पारथ्याशी असलेल्या टेंभली या आदिवासी पाड्याचं नाव एका क्षणात देशभरात पोहोचलं होतं. त्यानंतर या गावाच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, पहिलं आधारकार्ड मिळालेलं टेंभली ते दुर्लक्षित टेंभली गाव असं चित्र सध्या टेंभलीचं झालंय.

पहिल्या आधारकार्डधारक रजनी सोनवणेंची व्यथा

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते रजनी सोनवणे यांना आधार कार्ड देण्यात आलं. आज याच रजनी सोनवणे यांचं नाव ऑनलाइन रेकॉर्डवर दिसत नाही. ऑनलाईन रेकॉर्ड म्हणजे रजनी यांनी आधारकार्ड काढतांना दिलेली माहिती त्यांचं नाव किंवा आधारकार्ड नंबर टाकला की ऑनलाईन कुठंही पाहता येईल. मात्र, देशातील पहिलंच आधारकार्ड मिळवणाऱ्या रजनी यांचं नाव ऑनलाईन रेकॉर्डवरच दिसत नसल्यानं रजनी यांना शौचालय, घरकुल अशा योजनांपासून वंचित राहावं लागलंय. सध्या रंजनी या उदरनिर्वाहासाठी आठवडी बाजारात खेळणी विकतात.

भारतीय नागरिकांना नवी ओळख देणाऱ्या आधारकार्ड योजनेसाठी नंदुरबारचं टेंभली गाव निवडलं गेलं. त्याच गावातल्या रंजना सोनवणे या आदिवासी महिलेला देशातलं पहिलंच आधारकार्ड वितरीत करण्यात आलंय. त्यावेळी टेंभली गावाला सरकारी अधिकारी, राजकीय नेत्यांची रेलचेल, योजनांचा पाऊस, देशविदेशातील प्रसारमाध्यमांचा गराडा झाला होता. आधारकार्ड वितरणासाठी टेंभलीत धुराळा उडवत आलेल्या गाड्यांचा धुराळा कधीच खाली बसला आणि ग्रामस्थांच्या अपेक्षांनी उचल खाल्ली. मात्र, अनेक योजना आल्या पण त्या कागदावरच राहिल्याचं ग्रामस्थ सांगतात.

२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर आधारकार्डची ऑनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय शासकीय योजनांसाठी आधारकार्ड लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं होतं.

रजनी सोनवणेंचं आधारकार्डचं लिंक होईना...

सरकारी योजनेचा लाभ मिळावा म्हणून रंजना यांनी शौचालय तसंच पंतप्रधान घरकुल योजनेत अर्ज दाखल केला, मात्र आधारकार्ड ऑनलाइन लिंक नाही म्हणून सरकारी यंत्रणेने त्यांना घरकुल ही नाही आणि शौचालय ही दिलं नाही. आधार लिंक करण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालय तसच आधारकार्ड लिंक करणाऱ्या यंत्रणेकडे जाऊनही काहीच उपयोग झाला नाही. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवून थकलेल्या रंजना यांनी आधारकार्ड लिंक करण्याचे प्रयत्नच सोडून दिले आहेत. देशातील पहिले आधारकार्ड ओळख असलेल्या महिला असल्याचा सुरूवातीला खूप अभिमान वाटायचा आता त्याच गोष्टीचं खुप वाईट वाटत असल्याची खंत रंजना यांनी मॅक्स महाराष्ट्रजवळ व्यक्त केलीय.

मोदी सरकारनं डिजीटल इंडियाचा नारा दिला. मात्र, देशातील पहिल्याच आधारकार्ड धारक रंजना सोनवणे यांचं आधारकार्ड अजूनही ऑनलाईन लिंक झालेलं नाही. त्यामुळं रंजना यांना सरकारी योजनेतून शौचालय आणि घरकुल मिळालं नाही. देशातील पहिल्या आधारकार्ड धारक महिलेची डिजीटल इंडियात अशी परिस्थिती असेल तर इतरांविषयी काय झालं असेल, असा प्रश्न उपस्थित होतो.

Updated : 26 April 2019 8:45 PM IST
Next Story
Share it
Top