प्रिय अमृता,
X
वयाच्या चाळीशीत इमरोझसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागलीस. कोण काय म्हणेल वगैरे कसलीच पर्वा केली नाहीस. इमरोझ बाबतच नव्हे, अगदी जगण्याबाबतही बिनधास्त होतीस तू. शब्दश: बिनधास्त! अथांग समुद्रावर वावरणाऱ्या वाऱ्यासारखी जगलीस. मुक्तपणे आणि हवं तसं.
'अमृताने इमरोझला ठेवून घेतलंय' अशा कधी हलक्या आवाजात, तर कधी तोंडावर कित्येकदा चर्चा झाल्या. मात्र तेव्हाही तू ठाम राहिलीस. जागतिक किर्तीचा चित्रकार असलेल्या इमरोझला तू ठेवून घेतलं होतंस की निस्वार्थी प्रेमाची ती परिभाषा होती, हे चर्चा करणाऱ्यांना कधीच कळलं नसेल. कळणारही नाही.
तू 'इमरोझ'च्या नावासारखी जगलीस. इमरोझ या पारशी शब्दाचा अर्थ 'आज'. तूही फक्त 'आज'च जगलीस - भूतकालाची नि भविष्याची कसलीच चिंता न करता.
तुझा स्पष्टपणा आणि त्यातल्या खरेपणामुळे इमरोझसारखा सच्चा सोबती भेटला. साहीर लुधियान्वी आणि सज्जाद हैदरसोबतचं तुझं नातं इमरोझने किती सहजपणे स्वीकारलं! इमरोझने स्वत: साहीरचा फोटोच घरात लावणं असो किंवा सज्जादचे पत्र जपून ठेवणं असो... आपल्या जोडीदाराच्या प्रियकरांच्या आठवणीही जपून ठेवणं कुठल्याच मनाला झेपणारं नसतं. पण इमरोझच्या रुपाने तुला तसा जोडीदार लाभला. स्वातंत्र्याचा सच्चा पुरस्कर्ता असणारा.
पंजाबची सिंहीण असो वा साहित्य अकादमी मिळवणारी पहिली महिला लेखिका.. कितीतरी उपाध्या तुला तू न मागताच मिळत गेल्या. त्यामागे तुझा संघर्ष, कलात्मकता, सृजनशीलता, निडर वृत्ती असे अनेक गुण दडले होते. तू वेगळंच केमिकल होतीस.
तुला साहित्य अकादमी मिळाला, तुला ज्ञानपीठ मिळाला. तुला पद्मश्री मिळवणारी पहिली पंजाबी महिला होण्याचा मान मिळाला.इतकंच काय बुल्गारिया, फ्रान्ससारख्या देशांनीही साहित्यातील सर्वोच पुरस्कार देऊन तुझा गौरव केला. दिल्ली, जबलपूर वगैरे विद्यापीठांनी डाॅक्टरेट दिल्या. किती तरी पुरस्कार-सत्कार वगैरे. पण अमृता, इमरोझने दिलेलं 'प्रेम', 'आधार' आणि 'सोबत' सर्वात मोठा गौरव होता. म्हणूनच की काय शेवटचा श्वासही घेऊन तू इमरोझच्या कुशीतच विसावलीस. अख्यायिका वाटावी असं नातं.
अमृता, तुझी एक कविता आठवतेय. खूप कमी कविता वाचल्यात तुझ्या. त्यातली बेस्टय ही. आणि रिलेटेडही. कविता अशीय की :
मैं और तो कुछ नहीं जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म ख़त्म होता है
तो सब कुछ ख़त्म हो जाता है
पर यादों के धागे
कायनात के लम्हें की तरह होते हैं
मैं उन लम्हों को चुनूँगी
उन धागों को समेट लूंगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहींमैं तुझे फिर मिलूँगी!!
अमृता.. तू खरंच या अस्तित्त्वाच्या पटलावर नसलीस, तरी आठवणींच्या धाग्यांनी स्वत:ला विणून गेलीयेस. तू कायम आठवत राहशील.
आणि ऐक ना, आज असतीस तर तुझा आज तुझा बर्थडे असता. मृत्यूनंतर बर्थडे विश करत नाहीत, असल्या तद्दन फाल्तू गोष्टींवर तू विश्वास ठेवणारी नाहीस. तू प्रवाहाविरुद्ध पोहणारी. म्हणून श्रद्धांजली वगैरे देण्याचा टिपिकलॅझिम पार न पाडता इतकंच म्हणेन - हॅप्पी बर्थडे अमृता. लव्ह यू सो मच.
- नामदेव अंजना