बा..ई,..प...ण (भाग ९)
X
व्यक्ती पुरुष असो अथवा स्त्री , दोघांच्या जीवनात एक महत्त्वाचा कालखंड येऊन जातो. हा कालखंड असतो तो मुलाला " पुरुष " बनवणारा आणि मुलीला " स्त्री " बनवणारा. वयाच्या अवघ्या १२- १४ वर्षापासून या प्रक्रिया सुरु होतात. आणि व्यक्तीचे संपूर्ण जीवनच बदलून टाकतात. साप जशी जुनी कात टाकून देतो व अधिक चपळ आणि तजेलदार बनतो तसेच व्यक्तीही " वयात " आल्यावर आधिक समंजस अथवा प्रौढ बनत जाते. हा कालखंड महत्त्वाचा अशासाठी की , इथे जे आसपासचे वातावरण बदलते तिथे जीवनातील बरेच महत्वाच्या धारणा सुध्दा बदलल्या जातात. लहानपणी आवडणारी गोष्ट मोठे पणी आवडेलच असे होत नाही . लहानपणीची नावडती गोष्ट कदाचित मोठेपणात अधिक आवडू शकते. हा सगळा " केमिकल लोचा " असतो मेंदूतील . पण याकरिताच वयात येणाऱ्या स्त्री पुरुषाबरोबरचा संवाद अधिक महत्त्वाचा आसतो.
वयात येताना मुलगी...हा अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचा विषय आहे. लहानपणीचि आपली लाडकी परी हळुवारपणे व्हिनसमध्ये रुपांतरीत होत असते. लहानपणीचे भाबडे बोल विसरून ती " जबाबदारीची भाषा " अवगत करु पाहते. लहानपणीचा हट्टीपणा कमीतकमी होत जाऊन त्याची जागा समंजसपणात होते. लहानपणीचा अळखव खट्याळपणा तरुणी बनताना आपले रुपडं आमुलाग्र बदलतो. घरगुती खेळ निघून जातात आणि संसार नावाचा खेळ आपल्या आईच्या हाताखाली ती हळुवारपणे शिकायला लागते . याच कालखंडात पुरुषाबद्दलची ओढ तीव्र बनते , जा अत्यंत नैसर्गिक आहे. वयात येताना तिच्या सोबत येते ती " पाळी " . पाळीव्दारेच तिचे लहान मुलीतून तरुणीत आणि पुढे बाईमध्ये रुपांतर होते. हा पाळीचा कालखंड घरी अथवा आजूबाजूला विधायकरित्या चर्चा अथवा संवादाचा नसतो तर असते फक्त हळुहळु होणारी अस्पष्ट कुजबूज. हा आपल्या व्यवस्थेतील एक सर्वात मोठा दोष आहे.ज्या गोष्टी व्दारे मानवी जीवनात आपण प्रवेश करतो ती गोष्टच " कुजबूज स्तरावर " ठेवल्याने त्याला अपवित्रपण आपोआप चिकटते. वर्ज्य करावी अशी गोष्ट बनते. यातूनच मग स्त्री पाळीच्या काळात धार्मिक गोष्टीतून बाहेर फेकली जाते. कोकणात तर आजही तिला अस्पर्श ठरवले जाते. किती मागासपणा हा. विज्ञानयुगात जेथे आपण चंद्र शिवला तिथे आजही पाळीच्या काळात स्त्री अस्पर्श असावी याला काय म्हणावे ?? वास्तविक पाळीच्या काळात स्त्रीला अधिक मायेची , वात्सल्याची व आपुलकीच्या ऊबेची गरज असते हे केव्हा ध्यानात येणार ?? सभ्यतेच्या भ्रामक वरवंट्याखाली किती दिवस " पाळी मिळी गुप चिळी " असा मागासपणा करत राहणार ?? स्त्रीचे " स्त्रीत्व " आपण मनापासून स्विकारणार तरी केव्हा व कधी ?? विचार व्हावा.
माणसांनो...तुम्ही २१ व्या शतकात राहता. अवकाशात भल्याथोरल्या मोहीम आखून यशस्वी पण करता. मग एखादी मोहीम आपल्या घरातील स्त्रीला मग ती आई असो , बहीण असो ,पत्नी असो वा मुलगी असो. अशी मोहीम करुया की दर महिन्याला माझ्या घरातील स्त्रीला येणाऱ्या पाळीच्या कालखंडात तिला आवश्यक आसणारे " सँनिटरी नँपकीन अथवा पँड " मी स्वतः तिला आणून देईन. तिला विश्वास देईन की , या कुटुंबात तुझे " स्त्रीत्व " आम्ही स्विकारलयं. लौकरच समाजही स्विकारेल. एकदा ही मोहीम करून पहाच. आपल्या घरच्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरेल ना तो आनंद लाखो चंद्राच्या तोडीहून अधिक आसेल. गरज आहे ती ..तिला विश्वास देण्याची आणि स्वतः मधील भंपक पौरुषपण टाकून त्या जागी विधायक पौरुषपण जागवण्याची. या...पुढे या , बदलाची सुरुवात करुया.
!! पाळीच्या कालखंडात स्त्रीला अधिक जपावे...तिला प्रामाणिक सोबत करावी !!
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५