Home > मॅक्स ब्लॉग्ज > बा...ई...प...ण ( भाग १० )

बा...ई...प...ण ( भाग १० )

बा...ई...प...ण ( भाग १० )
X

प्रत्येक सजीवात आपल्याला हवे ते " निवड करण्याची क्षमता " उपलब्ध असते. ही क्षमता त्या सजीवाला कायमस्वरुपी व्यवहारात वापरता आली तर मग त्याचे जीवन किती आनंदानं न्हाऊन जाईल याचा विचार करा. निवड करण्याची क्षमता ही उपजतच जरी उपलब्ध असली तरीही व्यवहारात मात्र तिच्या वर अनेक बंधन असतात. ही बंधने एका व्यक्तीचे अथवा कुटुंबाचे , समाजाचे असू शकते. ह्या बंधनापायी स्वतःला हवे ते निवडून घेण्यात मोठा मज्जाव तयार होतो. तो इतका मोठा असतो की आपल्यामध्ये स्वतःला हवे ते " निवड करण्याची क्षमता " उपलब्ध आहे हेच जणू तो सजीव विसरुन जातो. त्याच्या जीवनाचे बहुधा सारे निर्णय मग त्याच्या " जवळचे " म्हणवणारे कुणी तरी घेत असते. स्त्री समाज याबाबतीत जरा जास्तच बळी पडत गेलाय .

निवड करण्याची क्षमता ...अंगभूत असूनही ती व्यवहारात अवलंबिण्यात मोठा मज्जाव स्त्रीला भोगावा लागतो. जीवनातील छोट्या मोठ्या प्रसंगात ते प्रकर्षाने दिसून येतेच. पण सर्वात महत्त्वाचा असणाऱ्या प्रसंगातही ते जेव्हा अगदी साधारणपणे घडून येते तेव्हा त्याचा विचार करणे भाग आहे. विवाह हा संस्कार फार मोठा असतो जीवनात . ह्या विवाह प्रसंगी पुरुष स्त्री निवडतो हे प्रमाण जास्त आहे , परंतु स्त्री पुरुष निवडते हे प्रमाण मात्र अगदी अल्प असेच आहे. पूर्वी " स्वयंवर " केली जात. यामध्ये आपल्या मनाजोगता जीवनसाथी निवडण्याची मुभा असे. ( अर्थात या स्वयंवराचे निमंत्रण कुणाला द्यायचे हा राजाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असायाचा , म्हणजे इथेही " चाँईस " मर्यादित ) या स्वयंवरा निमित्तानं स्त्री आपला जीवन साथी निवडे. पण आजकाल मात्र हे स्वयंवर घडणे शक्य नाही . एखादे स्थळ जेव्हा मुलीला चालून येते तेव्हा त्या स्थळाचा गुणगौरव इतका मोठा करून सांगितला जातो की त्याला " नाही " म्हणणे कठीण करून टाकले जाते. त्या मुलाची घरची परिस्थिती , नोकरी , इस्टेट अशा काही गुणांवर आपल्या मुलीला दृष्टीक्षेप टाकण्यास पालक फोकस करतात , कधीकधी दबाव आणतात. आपल्या मुलीचे भले व्हावे हा अंतर्मनी भाव असला तरीही वर्तन असे असते की "गुमानपणे हो म्हण ". यातून मुलगी भेदरते. आपल्या पालकांना ती " हो " कळवते. आणि मग पालकांना पसंत असणारा मुलगा तिचे " पाणीग्रहण " करायला तयार होतो. कटू वाटले , थोडे अतिशयोक्ती वाटली तरी हे वास्तव आहे. मुलगीने पसंत केलेला जोडिदार पालक किती स्विकारतात ? प्रश्न तिखट आहे परंतु आजची सच्चाई दाखवणारा आहे. समाजात रुढ झालेली प्रथा आहे की , " तिला " पुरुष निवडण्याचा अधिकार नाही , पुरुषाला मात्र ते अधिकार सर्रास आहेत . हे चित्र बदलायला हवे. ज्या व्यक्तीबरोबर संपूर्ण जीवन व्यतीत करायचे आहे ती व्यक्ती आपल्या मनाजोगती हवी हे पहिले पथ्य असावे . हे पथ्य व्यवहारात येण्यासाठी समाजाच्या वाटा अधिक व्यापक व खुल्या कराव्यात . स्त्रीला तिचा जोडिदार निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे . त्या स्वातंत्र्याला पूरक अशी साथ तिच्या कुटुंबाने करायला हवी. ज्याअर्थी मुलगी मोठी झाली त्याअर्थी स्वतःच्या जीवनाचे भलेबुरे किमान तिला कळते हा विश्वास हवा....आपण पालक म्हणून आपल्या मनातील पुरुष जेव्हा तिच्या करता निवडतो तेव्हा तिच्या मनाचा विचार सहसा होत नसतो. " लादला " जातो निर्णय आपला. यामध्ये सुख कुणाचेच नसते. आतल्या आत घूसमटीत जगत राहणे हेच मग जीवन बनते. अत्यंत क्लेशदायक असे हे आहे. यातील तपशीलाचे काही मुद्दे बाजूला ठेवून फक्त मुख्य आशयाला विवेकाने भिडून पहावे...इतकेच .

माणसांनो...जीवनातील कडूगोड , बरावाईट निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक सजीवाला समान असावा . कारण या निर्णयाचे सगळे चांगले वाईट परिणाम त्या सजीवालाच भोगायचे असतात. इतरांच्या व्दारे त्याच्या जीवनाचा निर्णय होणेपेक्षा त्याच्या स्वतःच्या आवडिने तो झाला तर अधिक न्याय्य होणार नाही का ? बाईपणाची ही दुखरी जागा आहे की , " निर्णयात तिला स्थान नसते " ......समजून घ्यायला हवे.

!! स्त्रीला निर्णय स्वातंत्र्य हवेच...भलंबुरं काही घडो !!

उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

Updated : 29 Nov 2018 6:23 PM IST
Next Story
Share it
Top