मासिक पाळीवर कर ; सरकार भिकारी !
X
एकीकडे इस्रोच्या माध्यमातून अवकाशात एकाचवेळी ढिगानं उपग्रह पाठवणारे आपण आणि दुसरीकडे त्याच श्रीहरिकोटापासून अवघ्या काही शे किलोमीटरच्या गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मासिक पाळीदरम्यान पॅड म्हणून मातीचा लेप लावून दिवस काढणाऱ्या महिला. कदाचित हे विदारक सत्य आपल्याच देशात असू शकतं. मात्र तरीही ही 'विविधता' मान्य करत आपण पुढे जात राहिलो. विशेषतः महिला सक्षमीकरण या गोंडस नावाखाली वेगवेगळे प्रयोग राबलेले गेले. जे शासकीय, संस्थात्मक आणि वैयक्तीक पातळीवर होते. त्यात अलीकडच्या काळात तर सॅनटरी नॅपकिनसाठी बघता-बघता चळवळ सुरू झाली. महिलांमध्ये जागृती झाली आणि सॅनिटरी नॅपकिनची विक्री कैक पटीनं वाढली. याला जागृती जितकी कारणीभूत होती, तितकीच महत्वाची बाब होती ती गरजेची. पण असं असताना काल-परवा बातमी आणि अनेकांच्या मनात सरकारच्या भुमिकेविषयी प्रश्नांचं काहूर माजलं. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा ठोकणाऱ्या सरकारचा हा दांभिकपणा खटकणारा असाच होता.
प्रस्तावित GST कर प्रणालीमध्ये १२ टक्के कर लावण्याचं नियोजन पुढे आल्यावर महिला वर्गातून प्रतिक्रिया उमटणं ही अगदी स्वाभाविक बाब होती. प्रत्यक्ष कर लागू झाल्यावर याचा फारसा मोठा परिणाम किमतीत होणार नसला तरी इतक्या संवेदनशील विषयात सरकार इतकं सर्रास निर्णय कसं घेऊ शकतं, हा प्रश्न प्रत्येक महिलेला सतावणारा आहे. 'मासिक पाळी महागली' या हेड लाईन टिव्हीच्या स्क्रीनवर पाहिली आणि डोक्यात विचारांची सैर कुठच्या कुठे गेली. कारण तसं सरळ होतं, पण चॅनेलवाल्यांनी 'असं' हेडिंग देणं पटलं नाही. पण अभिव्यक्तीच्या आणि सृजनशीलतेच्या आड कोण येणार? सॅनिटरी पॅड ही चैनेची बाब नाही तर ती महिलांच्या मूलभूत गरजेची आहे, हे सरकारच्या लक्षात न येणं, हे कोणत्या मानसिकतेचं लक्षण?
आज 28 मे World Menstrual Hygiene Day. 2014 साली याची सुरुवात एका जर्मन एन जी ओ (WASH United) ने केली. या मागे मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेचे भान निर्माण करणे, पाळीचे चांगले व्यवस्थापन व्हावे म्हणून सोयी सवलती निर्माण करणे अशी उद्दिष्ट्ये होती. मे म्हणजे मेंस्ट्रुएशन, 28 का, तर साधारण पाळीचा महिना 28 दिवसांचा असतो म्हणून. मे महिना वर्षाचा पाचवा महिना, साधारण पाळी पाच दिवसांची म्हणून. या दिवसाच्या नावाचे मराठी भाषांतर 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' असे केले आहे आणि तसे होणे स्वाभाविक आहे. याचे काही अर्थ आहेत.एक सरळ साधा आणि वैज्ञानिक अर्थ असा की मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता महत्वाची आहे. पाळीचे रक्त टिपून घेण्यासाठी चांगली, सोयीची साधने प्रत्येकीला मिळायला हवीत. हा तिचा मूलभूत हक्क आहे. नाही तर प्रजनन मार्गामध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो. हे ठीकच.
दुसरा एक लपलेला अर्थ असाही असू शकतो आणि तो तसा खूप आतवर आपण दीर्घ काळ साचवलेला आहे. तो असा की, मासिक पाळी म्हणजे स्त्रीशरीर आपली स्वच्छता करते. साचलेले अशुद्ध अस्वच्छ रक्त बाहेर टाकते. ते अपवित्रही असते.
एकदा का ते रक्त घाण आहे म्हणून बाहेर टाकले जाते असे म्हटले की गर्भाशय ही एक 'उत्सर्जन संस्था' होते. (याच रक्तावर गर्भ नऊ महिने पोसला जातो.असो) एखादी जागा घाण, अपवित्र, निषिद्ध , अस्पर्श मानली की त्या जागेची स्वच्छता करण्याचे कारण नाही, ती जणू कचरा कुंडी आहे, ती अधिक घाण झाली तरी काय हरकत आहे असे म्हणून तिच्या कडे पिढ्यान पिढ्या दुर्लक्ष केले गेले. उल्लेख सुद्द्धा नाही करायचा. केलाच तर सरळ नाहीच, कावळा शिवला वगैरे म्हणायचे. आंघोळ इत्यादी नाहीच. ज्याने पाळी निर्माण केली त्या देवाला सुद्धा हिची सावली चालत नाही, इतका धाक! रक्त थांबले की मग "शुद्ध" व्हायचे ! चौथ्या पाचव्या दिवशी ! आणि हे ज्ञान कोणी सांगितले? तर धर्मग्रंथांनी !! (पहा धर्मसिंधू आणि जगातील बहुतेक सर्व धर्मग्रंथ, 'कौमारभृत्यतंत्र' जे आजही आयुर्वेद पाठयपुस्तक आहे). ही सारी साहित्य संपदा पुरुषांनी जन्माला घातली हा इतिहास आहे. म्हणजे स्वच्छता कुठे करायला हवी? कोणी करायला हवी? स्त्रीशरीराची तर नक्कीच करायला हवी. पण मनाची देखील करायला हवी. एकदा का मासिक पाळीचा स्वीकार सन्मानाने केला की आपोआप स्वच्छता होणार. शरीराचीही. - डॉ. मोहन देस, सामाजिक कार्यकर्ते