तुला व्हावेच लागेल आंबेडकरवादी! डॉ. रुपेश पाटकर
तुझा जन्म भारतात झाला असेल तर
तुला व्हावेच लागेल आंबेडकरवादी,
मग तू कोणत्याही जातीचा अस.
आंबेडकरवादी होणे म्हणजे जाती अंताच्या लढाईचा सक्रिय सैनिक होणे आहे तुला.
'जात मानत नाही' एवढे म्हणणे पुरेसे नाही तुला.
जात मोडण्याची कृती करणे आहे तुला.
जाती बाहेरचे मित्र जोड,
त्यांच्या हातचे जेवण जेव,
जाती बाहेर लग्न कर.
अगदी आईबापाचा मूर्ख विरोध पत्करून कर!
जात मानणारे उत्सव सोड,
जात मानणारे सण सोड,
जात मानणारे देव सोड.
जातीच्या संघटनेवर बहिष्कार घाल, जातीच्या व्यासपीठावर बहिष्कार घाल.
जातीच्या खेळींना भुलू नकोस.
ते तुझा सत्कार ठेवतील,
तुला पुरस्कार जाहीर करतील.
तेव्हा भिडेखातर गप्प राहू नकोस,
निःसंशय नकार दे.
जिथे दुसर्या जातीतील माणसाला प्रवेश नाही, तिथे तू देखील बहिष्कार घाल.
वाटते तितके सोपे नाही हे.
तुझ्या मेंदूवर जात गोंदलेली असते तुझ्या नकळत!
होय, जात शिकवली जाते जन्मापासून अगदी पाव्हलाव, स्किनर मंडळींची तत्त्वे वापरुन!
म्हणून मनाचे डि-लर्निंग कर.
खानदानाचा अभिमान सोड, कुळ गोत्राचा अभिमान सोड.
नवे शिकण्यापेक्षा जुने सोडणे कठीण असते.
म्हणून मनाला गदगदून काढ.
प्रश्न विचार,
उत्तरांच्या पळवाटा उद्वस्त कर.
विचार मनाला, का नाही एकही भंगी तुझ्या नात्याचा,
का नाही एकही कचरा उचलणारा तुझ्या नात्याचा?
सवयच लाव सतत मनाला शुद्ध करण्याची,
तेव्हाच होईल 'सर्वेत्र सुखिनः संतु'.
......
डॉ. रुपेश पाटकर