Home > Election 2020 > धनगरांचा जाहीरनामा

धनगरांचा जाहीरनामा

धनगरांचा जाहीरनामा
X

"या डोंगरात कुणी येतंच नाय, आमी माणुस हाव आपलं जंगलात वांडार कसा पाला खातं हुड हुड केलं की ह्या झाडावर जातं तिथुन हाकाललं की दुसऱ्या झाडावर जातं ही तरा हाय"

वयाची शंभरी गाठलेले धुळु कोकरे बोलता बोलता धनगर वाड्यातील धनगर समाजाचे उपेक्षित जीवन समोर आणतात. ते या जगण्याला वानराची उपमा देतात याचं कारण देखील तसंच आहे. धनगर वाड्यातील सर्व कुटुंबांच्या कित्येक पिढ्या शेकडो वर्षापासुन या भागात वास्तव्य करत आहेत.

https://youtu.be/6fKcGzcDbGY

इचलकरंजीच्या घोरपडे संस्थानने या ठिकाणी धनगरवाडा वसवला होता. त्या काळात या गावातील कुटुंबांकडुन एक रुपया शेतीचा कर घेतला जात होता. या भागातील धनगरवाड्यांतील अनेक घरांच्या नोंदी आजही नाहीत.

पस्तीस वर्षापूर्वी बाबु ऐडगे यांच्या घराची पहिल्यांदा नोंद झाली. या गावाला गावठान नसल्याने ग्रामपंचायतीच्या नावे जमीनच नाही. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या पाणीपुरवठा सोडलं तर कोणतीच योजना या गावात कार्यान्वीत नाही.

‘त्यामुळे आम्ही केवळ पाणी पिऊन जगायचं का?’ असा संतप्त सवाल जनाबाई सोनु कोकरे करतात. या गावात कुटुंबाच्या नावं जमीनचं नसल्यानं एक ही घरकुल आजपर्यंत या गावात मंजूर झालेलं नाही. गावाला गावठान जोपर्यंत मंजूर होत नाही. तोपर्यंत बारा नागरी सुविधांचा या गावांना उपयोग नाही. होते ते गायरान चित्री धरणात गेले.

बयाजी मिसाळ सांगतात.. ‘नागरीकांच्या पुर्वीच्या जन्मनोंदी, जातीचे दाखले, घरं, अतिक्रमन क्षेत्र या कशाचीही नोंद सापडत नाही. यामुळे वनहक्क दावे फेटाळले जात आहेत.’

बयाजी ऐडगे सांगतात.. ‘येथील मुलांचे जातीचे दाखले निघत नसल्याने उच्च शिक्षणात स्कॉलरशिपसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे दहावी नंतर मुले शहरातील हॉटेलात कामाला जात आहेत.’

धनगरवाडा तीन हा डोंगर माथ्यावर असल्याने येथे वाहतुकीची सोय नाही. रुग्णवाहीका पायथ्यापर्यंतच पोहचते. तिथपर्यंत रुग्णाला पावसाळ्यात डोलीतुन, घोंगड्यातून, खांद्यावरुन पोहोचवावे लागते. रस्ता खडकाळ आहे. नाल्यावर पूल नाही. दवाखान्यात पोहोचणं अवघड आहे. त्यामुळे अत्याधुनिक सुविधा मिळत नाहीत. कोल्हापूर सीपीआरला पोहोचेपर्यंत रुग्ण दगावण्याची भिती असते. गावात आरोग्य कर्मचारी नियमीत येत नसल्याचे गावकरी सांगतात.

येथील लोकांचा पारंपारिक व्यवसाय शेती, पशुपालन, जंगलातील वस्तू गोळा करुन विकणे हा आहे. शेतीच्या बऱ्याच अतिक्रमणांची नोंद नसल्याने शेतीच्या योजना राबवता येत नाहीत. पीक विमा काढता येत नाही. शेतातील पिकाची वन्यप्राण्यांनी नासधुस केल्यावर वनविभागाकडुन पंचनाम्यासाठी सात बाऱ्याची मागणी केली जाते.

गंगाराम बाबु येडगे यांची चार जनावरं वन्य प्राण्यानी फस्त केली. याबाबत वनखात्यात गेल्यावर उलट त्यांनाच ‘या भागाचा सातबारा तुमच्या नावे आहे का?’ असा उलट सवाल त्यांना ऐकावा लागला. वर्षानुवर्षे जंगल जतन करणाऱ्या धनगर समाजासोबत असे वर्तन करणाऱ्या वन खात्याला, जंगलातील वन्य प्राण्यांना आवश्यक असणारे या परीसरातील बकरा गवत नष्ट झाल्याचे दिसत नाही.

या परिसरातील बकरा गवत झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे वन्यप्राणी चाऱ्याच्या शोधात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात तसेच मानवी वस्तीत घुसत आहेत. वन खात्याने या गवताचा वेळेवर बंदोबस्त न केल्यास वन्यप्राणी नष्ट होऊन इथल्या जैव विविधतेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

या परीसरात अस्टम बाभळीचे वृक्षारोपन वनखात्याने काही वर्षापुर्वी केले होते. या बाभळी आज आडव्या आहेत. या बाभळीखाली देखील चारा उगवत नाही असे लोकं सांगतात. वर्षानुवर्षे लोकांनी जतन केलेली वनसंपदा जतन न करता इथल्या वातावरणात तग न धरणारी झाडं लाऊन वनखात्याने काय साध्य केले? हा सवाल आता स्थानिक उपस्थित करत आहेत.

येथील लोक जंगलातील मध, हिरडा, शिकाकाई, तमालपत्र गोळा करुन अर्थार्जन करत होते. मात्र, वनखात्याने याचा ठेका दुसऱ्या भागातील ठेकेदाराला दिल्याने तो तुटपुंजी मजुरी देऊन हा माल गोळा करुन नफा कमावतो. धनगरवाड्याचे सरपंच बाबु येडगे हा ठेका केवळ स्थानिकांना देण्यात यावा अशी मागणी करतात.

पंचायत राज व्यवस्थेची सुरवात 1952 ला झाली. तरी धनगरवाड्यापर्यंत त्या विकासाची कृष्णा आजपर्यंत पोहोचलीच नाही. शाहू महाराजांनी राज्यातील उपेक्षितांना आसरा देऊन त्यांची घरे उभी केली. त्यांच्याच कोल्हापूर जिल्ह्यातील हे धनगरवाडे आज उपेक्षित आयुष्य जगत आहेत.

सर्व पक्षांमध्ये स्वतःचा विकास करणाऱ्या धनगर समाजातील फायरब्रॅन्ड नेत्यांना त्यांनी घातलेल्या रेबॅन गॉगलमधुन समाजाची ही उपेक्षा दिसणार का? हा सवाल आहे.

Updated : 6 Oct 2019 3:06 PM IST
Next Story
Share it
Top