समृद्धी महामार्गावरील कामांविरुद्ध शिवसेना आमदार रस्त्यावर
X
बुलडाणा : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या असलेले वहिवाटीचे मार्ग, शेतात जाण्याचे रस्ते पूर्णतः बदलले आहे, अशी तक्रार होते आहे. एवढेच नाही तर महामार्गाच्या खाली ठेवलेले अंडरपास हे अतिशय छोटे असून त्यातून बैलगाडी सुद्धा जात नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर फेऱ्याने जावं लागत असल्याची तक्रार करत देखील शेतकरी करत आहेत. शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यानी समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधात मेहकर येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केलं आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामामुळे मेहकर, लोणार तालुक्यातील जवळपास शंभर किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. ते तात्काळ दुरुस्ती करून द्यावी, पालखी मार्ग तात्काळ दुरुस्ती करून द्यावा, शेतकऱ्यांना रस्ते करून द्यावे, यासाठी हे आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठीचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. पण समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधातच शिवसेनेच्या आमदाराने हे आंदोलन केल्याने पक्षाला घरचा आहेर मिळाला आहे.