FRP प्रश्नावर राजू शेट्टी आक्रमक, 7 नोव्हेंबरला साखर आयुक्तालयावर मोर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी ऊस उत्पादकांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्याचा आढावा घेणारा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट
X
गेल्या वर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड (Sugarcane) झाली होती. त्यामुळे ऊसाचे उत्पादन वाढले होते. परिणामी साखर निर्मीती अधिक झाली होती. त्याबरोबरच गेल्या वर्षी इथेनॉल (ethanol production) निर्मीतीतूनही कारखान्यांना चांगले पैसे मिळाले. मात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ऊसाला FRP पेक्षा 200 रुपये तर येणाऱ्या तोडणीच्या ऊसाला FRP पेक्षा 350 रुपये जास्त मिळावेत, अशी मागणी राजू शेट्टी (Raju shetty) सरकारकडे केली आहे.
पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, स्व. गोपिनाथ मुंडे (Gopinath munde) ऊसतोडणी मजूर महामंडळाला 10 रुपये प्रति टन पैसे दिले जातात. आम्ही 10 रुपयांपेक्षा अधिक पैसे द्यायला तयार आहोत. मात्र त्यासाठी महामंडळाने आम्हाला मजूरांचा पुरवठा करावा. ज्यामुळे मुकादमांच्या खंडणीखोरीचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही, असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
अनेक कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचा काटा मारला जातो. त्यामुळे सरकारने सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल (Digital weight Forks) करावेत आणि यावर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेतून केली आहे.
7 नोव्हेंबर रोजी ऊस परिषदेत करण्यात आलेल्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारविरोधात पुण्यातील साखर आयुक्तालयावर (sugar commissionerate) राज्यभरातील शेतकऱ्यांसह मोर्चा काढणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे सरकार राजू शेट्टी यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन त्या मान्य करणार की नाही? हे पहावे लागणार आहे.