परदेशात अभिव्यक्तीचे वचन, देशात मात्र दमन?
X
जर्मनीमध्ये झालेल्या जी ७ राष्ट्रांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी कटीबद्ध असल्याच्या निवेदनावर स्वाक्षरी केली. तर दुसरीकडे भारतात त्याच दिवशी मोहम्मद झुबेर या पत्रकाराला दिल्ली पोलिसांनी अटक केली. ४ वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त ट्विट प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्याआधी पत्रकार राणा अय्युब यांचे ट्विटर अकाऊंट वादग्रस्त ट्विटचे कारण देत निलंबित करण्यात आले. भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेल्या संकटाची ही प्रचिती आहे, असा आरोप केला जातो आहे.
मोहम्मह झुबेर हे अल्ट न्यूज या फॅक्ट चेक करणाऱ्या वेबपोर्टलचे सहसंस्थापक आहेत. सोशल मीडियावर ज्या पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होतात, त्यामागील सत्य शोधण्याचे काम ते करतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वप्रथम त्यांनीच आक्षेप नोंदवत याची माहिती दिली होती. एवढेच नाही तर विशिष्ट समुदायाविरोधात सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट आणि व्हिडिओ सत्य आहेत की खोटे आहेत, हे शोधून लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम ते करत आहेत. त्यांना अटक करताना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही, असा आरोप त्यांचे सहकारी आणि अल्टन्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी केला आहे. मोहम्मद झुबेर यांनी सातत्याने धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट आणि व्हिडिओमागील सत्य शोधण्याचे काम केले आहे. त्यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेकांना निषेध व्यक्त केला. अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही आर के लक्ष्मण यांचे एक जुने व्यंगचित्र शेअर करत य़ा अटकेचा निषेध केला आहे. यामध्ये पोलीस एका व्यक्तीला अटकेचे कारण सांगत आहे, अफवा पसरवली म्हणून तुला अटक केलेली नाही,पण तू वस्तुस्थिती मांडली म्हणून तुला अटक करण्यात आली आहे, असा या ट्विटचा आशय आहे.
झुबेर यांनी ४ वर्षांपूर्वी एक ट्विट केले होते, त्यामध्ये २०१४ पूर्वी हॉटेल हनीमून आणि २०१४ नंतर हॉटेल हनुमान असे म्हटले होते. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार एका व्यक्तीने केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्या पद्धतीने पोलिसांनी झुबेर यांना अटक केली, ती बेकायदेशीर असल्याचा आरोप होतो आहे.
एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत पंतप्रधान मोदी ग्वाही देत असताना देशांतर्गत मात्र ट्विट आक्षेपार्ह असल्याचे कारण देत पत्रकारांची अकाऊंत निलंबित केली जात आहेत. मोहम्मद झुबेर यांनाही अशी नोटीस दिली गेली होती. नुकतेच पत्रकार राणा अय्यूब यांचेही ट्विटर खाते माहिती तंत्रज्ञान कायद्याचा उल्लंघन केल्याप्रकरणी होल्ड करण्यात आले आहे. राणा अय्युब यांच्यावर ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी कारवाई देखील केली होती. एकूणच देशातील धार्मिक द्वेष, एकाधिकारशाही, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यावर बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.