Home > News Update > कोरोनाविरोधातल्या लढाईत राज्य सरकारतर्फे एकही योजना नाही- चंद्रकांत पाटील

कोरोनाविरोधातल्या लढाईत राज्य सरकारतर्फे एकही योजना नाही- चंद्रकांत पाटील

कोरोनाविरोधातल्या लढाईत राज्य सरकारतर्फे एकही योजना नाही- चंद्रकांत पाटील
X

कोरोना संकटावर राज्य सरकारकडून केले जाणारे काम पुरेसे नाही, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोरोनाविरोधात राज्य सरकारने एक तरी योजना राबवली आहे का? याचाही शोध घ्यावा असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेल्या टू द पॉईंट या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारच्या कामाला विरोध नाही पण दोष दाखवणे विरोधीपक्षाचे काम आहे, असंही त्यांनी सांगितले आहे. रेशन दुकानावर धान्य मिळत नाही, कामगारांना जेवण मिळत नाही ही वस्तुस्थिती असून राज्य सरकारचे काम फार काही चांगले चाललेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षाला चर्चेला बोलवलंच नाही, म्हणूनच भाजपा आपल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाकडून महाराष्ट्रात 19 हजार शक्तीप्रमुख काम करत आहेत. आत्तापर्यंत 53 लाख लोकांपर्यंत मदत पुरवण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. १० लाख मास्क आणि सात लाख साहित्याचं वाटप केल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. सरकारमधले अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना काढून का टाकत नाही, त्यांची बदली का करत नाही? असा सवालही त्यांनी विचारलाय.

''केंद्र सरकारने धान्य दिले आहे. पण त्याचं वाटपही राज्य सरकार करत नाही?” असा सवालही त्यांनी केला आहे. “राज्य सरकार म्हणतं आम्ही रोज लाखो लोकांना जेवण देण्यासाठी निवारा केंद्र बनवले आहेत, पण मुंबईत गोरेगाव इथे असलेल्या निवारा केंद्रात दहा लोकही नसतात,” असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. “आमच्याकडे पैसे नाहीत हा दावा करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे सांगून केंद्र सरकारने सोळाशे कोटी रुपये पाठवले आहेत ते कुठे गेलेय़ बांधकाम विभागाकडे नऊ हजार कोटी रुपये आहेत ते का वापरत नाही असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला. इतर राज्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनातील निधी वळवला तसं महाराष्ट्र सरकारने का केलं नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहे.

मुख्यमंत्री मदतीसाठी महाराष्ट्रातील अनेक बड्या राजकारण्यांनी जे गडगंज श्रीमंत आहेत, त्यांनी किती रुपये दिले हे जाहीर करावे, असा आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना, रेल्वे ही मोठी यंत्रणा असून त्याचं नियोजन करायला लागतं, आदित्य ठाकरे यांना कळत नाही त्यांनी आपल्या बाबांना विचारायला पाहिजे असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला.चंद्रकांत पाटील याची ही मुलाखत पाहण्यासाठी आपण मॅक्स महाराष्ट्रचे युट्युब चॅनेल आणि फेसबुक सबस्क्राईब करा.

Updated : 17 April 2020 7:25 AM IST
Next Story
Share it
Top