Home > Election 2020 > वेश्यांचा जाहीरनामा: ‘सायेब धंदा करणाऱ्या बायांच्या मुलांना बाप असणार कुठून?’
वेश्यांचा जाहीरनामा: ‘सायेब धंदा करणाऱ्या बायांच्या मुलांना बाप असणार कुठून?’
Max Maharashtra | 14 Oct 2019 8:10 PM IST
X
X
धंदा करणाऱ्या बायकांच्या मुलांना बाप असणार कुठून? त्यांच्या जन्माचे शाळेचे दाखले कसे शोधून आणायचे. ह्या दाखल्या शिवाय जातीचा दाखला मिळणार नाही. असं हाफिसात सायेब लोक सांगतात. मग, आमच्या मुलांनी शिकायचं कसं?
असा सवाल गेली अनेक वर्षे वेश्या व्यवसाय करणाऱ्या किरण विचारतात. सफाई कामगार सफाईचे काम करतो शेतकरी शेती करण्याचे काम करतो. तसंच आम्ही वेश्या व्यवसाय करतो. मग आमच्या कामाला तुम्ही काम का म्हणत नाही? असा सवाल उपस्थित करत आमच्या कामाला काम म्हणून बघण्याची विनंती किरण मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना करतात.
या व्यवसायाकडे गुन्हेगारी नजरेनं पाहू नका, सरकार वेश्या व्यवसाय संदर्भात करत असलेल्या कायद्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत हा व्यवसाय करणाऱ्या महिलांची मतं विचारात घेत नाही. अशी खंतही त्या मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त करतात.
भारतातल्या अनेक शहरांमध्ये वेश्या व्यवसाय केला जातो. लैंगिक गरज भागवण्यासाठी सर्व स्तरातील लोक या वस्त्यांमध्ये गर्दी करताना दिसतात. वेश्या वस्तीवर उभ्या असणाऱ्या आपल्याला हव्या त्या बाईला शोधून तिच्याबरोबर संभोग करतात. मात्र, तासभर लैंगिक गरज भागवण्यासाठी पैसे मोजणारे सो कॉल्ड उच्चभ्रू सोसायटीतील लोक पुन्हा एकदा आपल्या घरी गेल्यावंतर या वस्त्यांमधील स्त्रियांना बदनाम करत असतात.
भारतामध्ये वेश्या व्यवसाय करणारा महिलांचा एक मोठा वर्ग आहे. मात्र, या महिलांच्या समस्या कोणत्याही सरकारच्या अजेंड्यावर येत नाहीत.
गोकुलनगर सांगली येथील वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या कार्यकर्त्या तसेच वेश्या व्यावसायिक अंजली राजकीय नेत्यांबद्दल आपलं मत व्यक्त करतात...
‘या नेत्यांना वेश्यावस्तीतील मतं चालतात. निवडणूका आल्या की, आमच्या घरोघरी ते मतं मागायला येतात आणि एकदा खुर्चीवर जाऊन बसले की, आम्ही वेश्या असल्याचे त्यांच्या लक्षात येते.
सांगलीच्या पुरात जीव वाचवण्यासाठी आम्हाला साधी बोट पाठवली नाही तर आम्ही रिक्षाच्या वरच्या टपावर बसून जात आमचा जीव वाचवला. हे नेते आमच्या काय उपयोगाचे आहेत. अगोदर आमचा गुंडांकडून पोलिसांकडून छळ व्हायचा. पण आता आम्ही संघटित झालो आहोत. त्यामुळे न्याय मागण्यासाठी आम्ही कुणाच्या दारात जात नाही. तर आम्ही एकत्रित अन्यायाविरोधात आवाज उठवतो.
समाजातील हा घटक वंचीतातील वंचित आहे. इतर वंचित घटक देखील या महिलांना सन्मान देत नाही. याबाबत रेणुका कांबळे सांगतात...
आंबेडकर जयंतीसाठी आमच्याकडून अनेक गट वर्गणी घेऊन जायचे आणि आम्ही त्यांच्या मिरवणूक आणि कार्यक्रमात सहभागी झालो की, आम्हाला हाकलून लावायचे. त्यांना आमची वर्गणी चालायची पण कार्यक्रमात आम्ही चालत नव्हतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आमच्या हक्कासाठी लढू शकतो. यासाठी आम्ही स्वतः जयंती साजरी करायचा निश्चय केला. मात्र, समाजाकडून मोठा विरोध झाला. त्याला न जुमानता सहा वर्ष झाले. आम्ही आमच्या वस्तीत आंबेडकर जयंती साजरी करत आहोत.
वेश्या महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीना सेशू सांगतात की...
सुरवातीला या महिलांचे आर्थिक शोषण खूप होत होते. या महिला राहतात त्या वस्तीत पन्नास पैशाची टिकली पन्नास रुपयाला विकली जायची. महिलांच्या लक्षात आल्यावर त्या स्वतः मार्केटमध्ये जाऊ लागल्या. संग्राम संस्था आणि वेश्या अन्याय हक्क परिषदेच्या माध्यमातून त्या करत असलेल्या कामास काम म्हणून स्वीकारावे यासाठी त्यांचा लढा आजही सुरू आहे.
कर्नाटकात देवदासी प्रथा बंद झाल्यानंतर तिथल्या देवदासी महाराष्ट्रातील सांगली, पुणे, मुंबई या भागातील वेश्या वस्तीत येऊन काम करू लागल्या. या महिलांनी वेश्या व्यवसायाला काम म्हणून स्विकारले आहे. यामध्ये शोषण आहेच. पण या व्यवसायाला संरक्षण मिळायला हवं अशी मागणी या महिला करतात.
शहरातील इतर झोपडपट्टीत ज्या समस्या आहेत. त्याच समस्या या महिलांच्या वस्तीत आहेत. मात्र, यांच्याकडे साफ दुर्लक्ष होते. एच आय व्ही रोगाचे वास्तव समोर आल्यानंतर या महिला रोगांपासून कशा वाचतील. या संदर्भात सरकारने योजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी होती.
मात्र, योजना अशा करण्यात आल्या की, यांच्याकडे येणाऱ्या लोकांना एड्स होता कामा नये. या महिलांचा विचार सरकारने केला नाही. म्हणजे या महिलांशी संभोग करणाऱ्या व्यक्तींचं संरक्षण सरकार करतं. मात्र, दरवेळी लोकशाहीत बोटाला शाई लावून मतदान करणाऱ्या स्त्रियांची काळजी सरकारला महत्वाची वाटत नाही.
या महिला वेगवेगळ्या ठिकाणाहून स्थलांतरीत होऊन वर्षानुवर्षे वस्त्यांमध्ये राहतात. यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
लोकशाहीचा एक भाग असलेल्या या महिलांचा कोणतेही राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश करत नाही. किंवा तसं आश्वासन देखील दिसत नाही.
त्यामुळे आम्ही या देशाचे नागरीक आहोत की नाही? अशी भावना या महिलांच्या मनात निर्माण होत आहे. या महिलांकडे येणाऱ्या कोणत्याही पुरुषाला त्या कधीही हिंदू, मुस्लीम, श्रीमंत, गरीब, नेता असा भेदभाव करत नाही. मात्र, वेश्या वस्तीवर असणाऱी ही समानता अजुनही या सो कॉल्ड पाढरपेशा समाजात येत नाही.
https://youtu.be/2iqT-KlwIiA
Updated : 14 Oct 2019 8:10 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire